पुस्तके वाचूया, थोर पुरुषांना मनात घर देऊया – तेव्हाच घडेल उद्याचा सुंदर भारत!
प्रस्तावना –
“पुस्तके ही मूक गुरू आहेत” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण आज या मोबाईल आणि रीलच्या जमान्यात या मूक गुरूचा आवाज क्षीण होत चालला आहे. ६ सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण वाचतोय का? आणि वाचत असू तर काय वाचतोय?
*थोर पुरुष वाचणे म्हणजे काय?*
थोर पुरुष वाचणे म्हणजे त्यांची जयंती-पुण्यतिथीला त्यांच्या फोटोला हार घालणे नव्हे. थोर पुरुष वाचणे म्हणजे त्यांचे विचार आपल्या रक्तात भिनवणे.
आपण छत्रपती शिवाजी महाराज वाचतो तेव्हा आपल्याला कळते की वयाच्या १६ व्या वर्षीही अफाट ध्येय कसे बाळगायचे. वय लहान असले तरी विचार मोठा असला पाहिजे, हे शिवराय शिकवतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचतो तेव्हा कळते की गरिबी, अपमान, संघर्ष यातूनही जगातील सर्वात मोठे ग्रंथालय स्वतःच्या घरात कसे उभे करता येते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटले आहे – “माझ्या घराच्या भिंती पुस्तकांनी बनल्या आहेत.” ज्या माणसाने पुस्तकांना घरात जागा दिली, त्याने देशाच्या संविधानात कोट्यवधी लोकांना घर दिले.
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचल्याशिवाय आपण घडूच शकत नाही.
*आजची विदारक स्थिती -*
आज घुग्घुस, चंद्रपूर, वणी सारख्या भागात चित्र चिंताजनक आहे. तरुणाच्या हातात ५० हजाराचा मोबाईल आहे, पण ५० रुपयाचे पुस्तक नाही. तो दिवसाला ५ तास स्क्रीनवर घालवतो, पण ५ पाने वाचू शकत नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे अर्धवट ज्ञान घेऊन आपण स्वतःला ज्ञानी समजतोय. हीच खरी अधोगती आहे.
मोबाईलमुळे माहिती मिळते, पण पुस्तकामुळे बुद्धी मिळते. माहितीच्या गर्दीत बुद्धी हरवत चालली आहे.
*वाचनाने मनात घर कसे बनते?*
जेव्हा आपण एखाद्या थोर पुरुषाचे चरित्र वाचतो, तेव्हा तीन गोष्टी घडतात –
*१. ज्ञान वाढते -* पुस्तक आपल्याला जगाचे ज्ञान देते.
*२. विचार समृद्ध होतात -* चांगले विचार आपल्याला चांगले निर्णय घ्यायला शिकवतात.
*३. ध्येय निश्चित होते आणि यशाची वाट सुकर होते -* ध्येयाशिवाय जीवन म्हणजे पत्त्याशिवाय प्रवास. थोर पुरुष आपल्याला ध्येय देतात.
म्हणून माझे स्पष्ट मत आहे, प्रत्येकाने आपल्या घरात देव्हाऱ्या शेजारी एक पुस्तकांचा कोपरा करावा. जिथे देवाची पूजा होते, तिथेच ज्ञानाचीही पूजा झाली पाहिजे.
*शेवटी एकच आवाहन -*
घुग्घुसच्या मातीत प्रचंड गुणवत्ता आहे. इथला विद्यार्थी, इथला कामगार, इथला युवक जग जिंकू शकतो. फक्त गरज आहे, पुस्तकाला पुन्हा मित्र बनवण्याची.
*वाचा, विचार करा, शिका आणि प्रगती करा !*
*कारण वाचणारा समाजच घडणारा समाज असतो आणि थोर पुरुषांना मनात घर देणाराच खरा वारसदार असतो.*







