Home Breaking News उन्हा-पावसापासून लेकरांच्या मायेचं छत; लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने घुग्घुसच्या शाळांना दिला सुविधांचा आधार...

उन्हा-पावसापासून लेकरांच्या मायेचं छत; लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने घुग्घुसच्या शाळांना दिला सुविधांचा आधार लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; घुग्घुस येथील शाळांमध्ये शेडचे लोकार्पण व स्कूल बॅग वाटप

7

उन्हा-पावसापासून लेकरांच्या मायेचं छत; लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने घुग्घुसच्या शाळांना दिला सुविधांचा आधार

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; घुग्घुस येथील शाळांमध्ये शेडचे लोकार्पण व स्कूल बॅग वाटप

घुग्घुस, ता. चंद्रपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी वातावरण मिळावे या उदात्त हेतूने लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने घुग्घुस येथे एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला आहे. फाऊंडेशनतर्फे शहरातील पाच प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय शेडचे बांधकाम करून त्याचे थाटात लोकार्पण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाप्रती असलेली ओढ अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा कॉलनी क्रमांक २, उर्दू शाळा, पीएम श्री शाळा, मुलांची शाळा आणि हिंदी शाळा या पाच शाळांमध्ये या शेडची उभारणी करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या कडक उन्हात आणि पावसाळ्याच्या संततधार पावसात चिमुकल्यांना उघड्यावर बसावे लागू नये, ही या मागची खरी तळमळ आहे. केवळ उन्हा-पावसापासून संरक्षणच नव्हे, तर या शेडचा उपयोग अनेक कारणांसाठी होणार आहे. शाळेची सकाळची प्रार्थना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारच्या मध्यान्ह भोजनासाठी या शेडचा वापर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता स्वच्छ, सुरक्षित आणि सावलीच्या ठिकाणी बसून भोजन करता येणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. विद्या पाल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फीत कापून या शेडचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कांबळे, डांगे सर, तरारे सर, गोखरे सर यांच्यासह लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचे अनुराग मत्ते, श्रीरंग पोतराजे, सर्व शाळांचे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते स्कूल बॅग वाटप. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या स्कूल बॅग देण्यात आल्या. नवीन बॅग हातात पडताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता, तो अवर्णनीय होता. पुस्तक-वह्या व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि शाळेची आवड निर्माण होण्यासाठी ही बॅग नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करत आहे. ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करून प्रत्येक लेकराला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा फाऊंडेशनचा ध्यास आहे.

विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक, पालक आणि घुग्घुसवासीयांनी लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचे मनापासून आभार मानले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.