Home Breaking News • बोडखा (मोकाशी) येथे पट्टेदार वाघाचा धुमाकूळ दोन शेळ्या ठार, बैल जखमी...

• बोडखा (मोकाशी) येथे पट्टेदार वाघाचा धुमाकूळ दोन शेळ्या ठार, बैल जखमी • शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण वाघाला तातडीने जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

17

• बोडखा (मोकाशी) येथे पट्टेदार वाघाचा धुमाकूळ दोन शेळ्या ठार, बैल जखमी

• शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण वाघाला तातडीने जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

वरोरा : वरोरा तालुक्यातील टेमुर्डा वनक्षेत्रातील बोडखा (मोकाशी) परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या शेळ्या व जनावरांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या असून एक बैल जखमी झाला आहे.सदर घटना 19 सप्टेंबर 2026 ला घडली.
काही दिवसांपूर्वी शेतकरी कुंडलिक कामडी तसेच पशुपालक डोमाजी तुराळे यांच्यावरही वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार करणजी देवतळे यांच्या निवासस्थानी आक्रोश मोर्चा नेला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यानंतर वनविभागाने बोडखा परिसरात कॅमेरे लावून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, वनपाल चव्हाण आणि वनरक्षक माहुलकर यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने ड्रोनच्या सहाय्याने तसेच प्रत्यक्ष शेतशिवारात शोधमोहीम राबवली. मात्र वाघाचा ठावठिकाणा निश्चितपणे लागला नसल्याने त्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही. वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यास अद्याप जिल्हास्तरावरून परवानगी मिळालेली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

शनिवारी वनविभागाचे पथक बोडखा परिसरातील शेतशिवारात वाघाच्या शोधासाठी गेले असतानाच पट्टेदार वाघाने पशुपालक भास्कर मेश्राम आणि शेतकरी दिलीप थाटे यांच्या जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या, तर एक बैल जखमी झाला. ठार झालेल्या शेळ्यांमध्ये एक बकरा आणि एका गर्भवती शेळीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मृत शेळ्यांचा स्थळ पंचनामा केला. संबंधित पशुपालकांना नियमानुसार आर्थिक मोबदला देण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतीच्या कामांवरही परिणाम

वाघाच्या भीतीमुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने महिला शेतमजुरांमध्येही भीतीचे वातावरण असून मजुरीसाठी जाण्यास त्या तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

दोन दिवसांत वाघाला जेरबंद करण्याची मागणी

बोडखा परिसरातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला जिल्हास्तरावरून आवश्यक मनुष्यबळ व सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच वनविभागाच्या पथकांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

येत्या दोन दिवसांत पट्टेदार वाघाला जेरबंद करावे, अन्यथा वाघाच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास बोडखा ग्रामस्थांचा मोर्चा चंद्रपूर येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.