Home Breaking News अखेर संपला प्रतीक्षेचा वनवास ! घुग्घूसच्या हक्काच्या रुग्णालयाचे थाटात लोकार्पण, घुग्घूसकरांच्या डोळ्यात...

अखेर संपला प्रतीक्षेचा वनवास ! घुग्घूसच्या हक्काच्या रुग्णालयाचे थाटात लोकार्पण, घुग्घूसकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू घुग्घूस ग्रामीण रुग्णालयाचा अखेर श्रीगणेशा; पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पणाने आरोग्य पर्वाला सुरुवात

2

अखेर संपला प्रतीक्षेचा वनवास ! घुग्घूसच्या हक्काच्या रुग्णालयाचे थाटात लोकार्पण, घुग्घूसकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू

घुग्घूस ग्रामीण रुग्णालयाचा अखेर श्रीगणेशा; पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पणाने आरोग्य पर्वाला सुरुवात

घुग्घूस : काळ्या कोळशाच्या खाणी, औद्योगिक धुरात अडकलेला घुग्घूस आणि वर्षानुवर्षे जीव मुठीत घेऊन उपचारासाठी चंद्रपूरची वाट पाहणारा घुग्घूसकर… अखेर या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. घुग्घूसच्या जिव्हाळ्याचा, अस्मितेचा आणि हक्काचा प्रश्न बनलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा अखेर श्रीगणेशा झाला आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या शुभहस्ते शनिवारी या बहुप्रतिक्षित ग्रामीण रुग्णालयाचे दिमाखदार लोकार्पण पार पडले. या लोकार्पणासोबतच घुग्घूससह वणी, तेलवासा, मुरकुटी, चिचपल्ली परिसरातील लाखो नागरिकांच्या हक्काच्या आरोग्य सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.

*काळजाचा ठोका चुकवणारा प्रवास थांबणार…*

घुग्घूस हे औद्योगिक आणि कोळसा नगरी. वेकोलिच्या खाणी, सिमेंट, वीज प्रकल्पांमुळे येथे हजारो कामगार आणि त्यांचे कुटुंब राहते. पण गेल्या अनेक वर्षांपासून येथे हक्काचे रुग्णालय नसल्याने अपघात, प्रसूतीकळा, हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाला तात्काळ 35 किमी दूर चंद्रपूरला पळवावे लागत होते. त्या प्रवासातच अनेकांनी जीव सोडल्याच्या जखमा आजही घुग्घूसकरांच्या काळजात ताज्या आहेत. वेळ आणि पैशाची तर गोष्टच वेगळी. या वेदनेतून आता कायमची सुटका होणार आहे.

इमारत बांधून तयार असूनही गेल्या काही काळापासून केवळ उद्घाटनाअभावी सेवा सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप होता. अखेर शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि शनिवारी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.

*आता खरी कसोटी – इमारत नाही, उपचार हवेत!*

लोकार्पण सोहळा थाटात झाला असला तरी घुग्घूसकरांची खरी अपेक्षा वेगळी आहे. नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे – *”आम्हाला फक्त इमारत नको, आम्हाला 24 तास डॉक्टर हवा, परिचारिका हव्यात, औषधे हवीत, रक्त तपासणी प्रयोगशाळा हवी, प्रसूती गृह आणि अपघात विभागात तातडीचे उपचार हवेत.”* कागदावरचे रुग्णालय नको तर प्रत्यक्षात रुग्णाचा जीव वाचवणारे रुग्णालय हवे, अशीच जनभावना आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर रुग्णालय पूर्ण क्षमतेने आणि मनुष्यबळासह सुरू करण्याचे मोठे आव्हान आहे.

*मान्यवरांची मांदियाळी*

या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी वसुमन पंत, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, नगराध्यक्षा सौ. दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, नगरसेवक विवेक बोढे, नगरसेवक आशीषभाऊ मासिरकर, नुरूल हसन सिद्धिकी, नगरसेवक गणेश पिंपळकर,संजय तिवारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पडगीलवार,विनोद चौधरी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने घुग्घूसकर नागरिक उपस्थित होते.

या लोकार्पणाने घुग्घूसच्या विकासात एका नव्या आरोग्य पर्वाची सुरुवात झाली आहे.