Home Breaking News • विसापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणार : सुधीर...

• विसापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणार : सुधीर मुनगंटीवार • भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; आरोग्य सेवेला मिळणार बळ

7

• विसापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणार : सुधीर मुनगंटीवार

• भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; आरोग्य सेवेला मिळणार बळ

विसापूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देणे शक्य व्हावे, या उद्देशाने विसापूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विसापूर येथे कार्यरत आरोग्य अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर आणि भाजपा युवा मोर्चाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी महेश तुराणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विसापूर हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून, येथील तसेच आजूबाजूच्या गावांतील अनेक नागरिक उपचारासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांना मुख्यालयी राहण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, आरोग्य सेवांच्या तत्परतेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही वेळी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास डॉक्टर मुख्यालयी उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विसापूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा आणि कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणीही करण्यात आली. या सुविधेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे शक्य होणार असून, विसापूरसह परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा महत्त्वपूर्ण प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडताना संबंधित विभागाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून निवास इमारतीचे काम मार्गी लावण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.

नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य सुविधा आणि स्थानिक विकासाचे प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे संदीप श्रीहरी पोडे यांनी यावेळी सांगितले.