दया नायक आणि टीमची कामगिरी
ठाणे: उत्तर प्रदेश राज्यात ८ पोलिसांचा गोळ्या घालून खून करणाºया विकास दुबेचा कालच एन्काऊंटरमध्ये खात्मा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याच्या दोन साथीदार बेड्या ठोकण्यात आल्या. ही जबरदस्त कारवाई एन्काऊंटर स्पेशालिस्ट दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) जुहू पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पथकासह ठाणे येथे केली. यूपीच्या ८ पोलिसांच्या खून प्रकरणात या दोन्ही आरोपींचा सहभाग होता. तसेच सन २००१ साली राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येसह अनेक गुन्ह्यात विकास दुबेसह सहभागी असल्याची कबुली अटक आरोपींनी दिली. या आरोपींच्या अटकेसाठी यूपी पोलिसांनी रोख बक्षीसदेखील जाहीर केले होते.
गेल्या काही दिवसांपासून यूपीमध्ये विकास दुबे नावाच्या गुंडाची दहशत पसरली होती. त्याला अटक करण्यासाठी ३ जुलै रोजी कानपूरमधील बिकरू गावात यूपी पोलिसांचे पथक गेले होते. त्यावेळी विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात यूपी पोलीस दलातील ८ पोलीस शहीद झाले. दरम्यान, पोलिसांच्या भीतीपोटी विकास दुबे व त्याचे साथीदार अंडरग्राऊंड झाले, तर दुसरीकडे यूपीच्या जनतेमध्ये आणि पोलीस दलात संताप व्यक्त होऊ लागला. ८ पोलिसांच्या हत्येप्रकरणी कानपूरमधील चौबेपूर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. १९२/२०२०) भादंवि कलम ३०२, ३०७, ३९४, १२०(ब) नुसार विकास दुबे व त्याच्या साथीदारांविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला. आठवड्याभरानंतर अखेर विकास दुबे याला मध्य प्रदेश येथे बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला यूपीत आणताना पोलिसांचे शस्त्र हिसकावून गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.
दरम्यान, विकास दुबेचे फारार साथीदार ठाणे जिल्ह्यात लपल्याची माहिती एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. सदर माहिती वरिष्ठांना सांगून दया नायक यांनी पोलीस पथकास ठाणे जिल्ह्यातील कोलशेत येथे सापळा लावून अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी(४६) व त्याचा ड्राईव्हर सुशिलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) यांच्या मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींच्या अटकेची माहिती यूपी पोलिसांना देण्यात आली असून, आरोपींना यूपी पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिले जाईल, अशी माहिती एटीएसने दिली.
विकास दुबेच्या फरार साथीदारांना अपर पोलीस महासंचालक देवेन भारती, विशेष पोलीस महासंचालक जयंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने, विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ बिटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर व पथकाने अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली.