काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधीयांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक 1 चा पक्ष बनवू…
-नाना पटोले
——————————————————
श्रीधर ढगे पाटील / द रिपब्लिक महाराष्ट्र
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला नंबर वनचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. विदर्भातील आक्रमक आणि अभ्यासू चेहरा असलेले नाना पटोले हे भाजपमधून खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि आता थेट प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक 1 चा पक्ष बनवू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली होती. 4 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. निवडीनंतर पटोले यांनी दिल्लीत जावून राहुल गांधीसह नेत्यांची भेट घेतली.
नाना पटोले संघर्षमय नेते
काँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि राज्यात नवे मोठे नेतृत्व उदयास आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते देशात चर्चेत आले त्यांच्या नेतृत्वाची दखल दिल्लीने घेतली. मोदी सरकारविरोधात बंडाचे निशाण रोवून राजीनामा देणारे ते देशातील पहिले भाजप खासदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हा त्यांच्या राजकारणाचा स्थायीभाव. काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. नाना पटोले 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, तर एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच अनेक वर्षांपासून त्यांना सभागृहातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. चारवेळा आमदार, एकवेळ खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे अनुभवी नेतृत्व आक्रमक कार्यशैली विधानसभा अध्यक्ष असताना दिसून आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा चांगलीच गाजली.
मागील लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली व ते आमदार बनले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
काँग्रेसला राज्यात नंबर वन करू असा निश्चय नाना पटोले यांनी व्यक्त केला असला तरी हे मोठं आव्हान राहणार आहे. त्यासाठी पटोले यांना लोकसभा, विधानसभा व जिल्हा पातळीवर नेतृत्व बदल, संघटन बांधणी साठी कठोर, धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. ज्या मतदार संघात काँग्रेसचे बळ कमी आहे, किंवा काँग्रेसचा प्रभावच नाही, अशा ठिकाणी पक्ष वाढीवर काँग्रेसला भर द्यावा लागणार आहे. पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम करताना तरुणांना संधी देण्याबरोबरच महिलांचाही सहभाग वाढवावा लागणार आहे.
( आपलं मत अवश्य अवश्य नोंदवा: 9423237001)