Home Breaking News मोठी बातमी ! खामगावात लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी!!

मोठी बातमी ! खामगावात लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी!!

68

खामगाव-प्राणवायू असलेल्या ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये याकरीता खामगाव सामान्य रुग्णालयात नव्याने लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी करण्यात आली आहे. प्लान्ट उभारणीचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून लवकरच हा प्लान्ट कार्यान्वित होणार असल्याची माहिती डॉ.निलेश टापरे यांनी दिली आहे.
कोरोना काळात राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण देशात कृत्रीम ऑक्सीजनचा तुटवडा जाणवला होता. ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात दुसरी लाट जोरावर असतांना लाखो रुपये खर्चूनही कोरोना रुग्णांना ऑक्सीजन मिळणे कठीण झाले होते. कधी नव्हे इतका देशात कृत्रीम ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ही समस्या बघता सध्या देशभरात कृत्रीम ऑक्सीजन निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. याकरीता शासन-प्रशासन प्रयत्नरत असून अनेक ठिकाणी ऑक्सीजन प्लान्ट उभे राहत आहेत. दरम्यान जिल्हा नियोजन निधीतून खामगाव सामान्य रुग्णालयात नव्याने लिक्वीड ऑक्सीजन प्लान्ट उभारण्यात आला आहे. याकरीता 70 ते 80 लाख खर्च आल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून याचे काम सुरु होते. हे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात प्रत्यक्षात हा प्लान्ट कार्यान्वित होणार आहे. यातून मोठया प्रमाणावर कृत्रीम ऑक्सीजन तयार होणार असून त्याचा रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. खामगाव सामान्य रुग्णालयात हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणारे आधीचे दोन प्लान्ट असून या नव्या लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची त्यात भर पडली आहे.

यामुळे आता खामगाव सामान्य रुग्णालयातील रुग्णांकरीता मुबलक प्रमाणात कृत्रीम ऑक्सीजन उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता नव्याने लिक्वीड ऑक्सीजन प्लान्टची उभारणी करण्यात आल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निलेश टापरे यांनी दिली आहे.

“खामगाव सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचारार्थ ऑक्सीजनचा तुटवडा भासत होता. ही बाब लक्षात घेऊन ऑक्सीजन प्लांट ची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा प्लांट रुग्णांसाठी सुविधेचा ठरणार असून लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. कोरोना बाधित तसेच अन्य रुग्णांसाठी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन आता उपलब्ध राहणार आहे.”

– डॉ. निलेश टापरे
वैद्यकीय अधीक्षक खामगाव