Home Breaking News बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा

बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा

90

 

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास

जालना : जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना ही आज (28 ऑक्टोबर) दुपारी घडली. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आरोपी तोंडाला रुमाल बांधून बँकेत शिरले

पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. त्यामुळे कर्मचारी घाबरले. आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले. त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली. काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न?

गेल्या आठवड्यात पुण्यात चार ते पाच चोरांनी महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही बँकेमध्ये सुरक्षा वाढवली जाताना दिसत नाहीय. याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आलाय म्हणजे चोरांचा हा दरोड्याचा नवा पॅटर्न आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.