अमरावती: अमरावतीत भडकलेल्या हिंसाचाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून सध्या संचारबंदी लावण्यात आली आहे दरम्यान पाचपेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांना तात्काळ करणे करण्याचे आदेश आहेत.
आजही अमरावतीत दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. दंगल रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. पाचपेक्षा अधिक लोक एकत्रं आल्यास त्यांना तात्काळ अटक केली जाणार आहे.
अमरावतीत राजकमल चौकात हिंसाचार झाला. जमावाने प्रचंड दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान केलं. तसेच एका पानटपरीलाही पेटवून दिलं. हातात लाठ्याकाठ्या घेऊन फिरणाऱ्या जमावाला पोलिसांनी प्रचंड चोप दिला. त्यानंतरही हा जमाव हटायचं नाव घेत नसल्याने पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच पाण्याचा माराही करावा लागला. मात्र, नंतर एसआरपीएफच्या तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आणि त्यांनी दिसेल त्याला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमाव पांगला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीसही गल्लोगल्ली फिरून कानोसा घेत आहेत.
हिंसा रोखण्यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांची कुमक कमी पडल्याने अमरावतीत बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशिममधून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. त्याशिवाय एसआरपीएफच्या तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पोलीस राज असल्या सारखं चित्रं निर्माण झालं आहे.
या भागात तणाव
राजकमल चौक,नमुना गल्ली, ऑटो गल्ली, इतवारा परिसर, पठाण चौक, सरोज चौक, सराफा मार्केट, कपडा मार्केट व जव्हारद्वार या भागात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे
संचारबंदी लागू
दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रं आलेले दिसल्यास त्यांना अटक केली जाणार आहे. चार दिवस ही संचारबंदी लागू राहणार आहे. नागरिकांनी बाहेर फिरू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. अर्धा किलोमीटरपर्यंतही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.