बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलिस ठाणे हद्दीतील ग्राम केळवद येथे भारतीय स्टेट बँकेवर दरोडा घालून अज्ञात दरोडेखोर जवळपास 20 लाखांची रोकड घेऊन पसार झाले होते. ही घटना 30 ऑक्टोंबरच्या सकाळी उघडकीस आली होती. दरोडेखोरांनी बँकेच्या मागील भिंतीतील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व अगोदर वीजपुरवठा खंडित करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोडणी तोडली व नंतर गॅस कटरने लॉकर तोडुन रोख रक्कम घेऊन फरार झाले होते. बँकेच्या मागे गॅस सिलिंडर, हँडग्लोज, बॅटरी आणि 24 ऑक्टोबरच्या तारखेचे एक तेलगू वृत्तपत्र सापडले होते. यामुळे दरोडेखोर परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांना शोधण्यासाठी चार पथके तयार केले होते तर सायबर विभागाचे एक स्वतंत्र पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत करण्यात आले होते.
चिखली ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चिखली पोलीस, बुलडाणा एलसीबी व सायबर सेल वेगवेगळ्या अँगलने तपास करत असताना त्यांच्या हाती काही सुगावे लागले. अशात पोलिसांना मोठे यश मिळाले व त्यांनी या दरोड्यातील 5 जणांना अटक केली आहे. पाचही आरोपी चिखली तालुक्यातील असून त्यात 3 दरोडेखोर नायगाव येथील तर 2 लोणी लव्हाळा येथील आहे. आज 13 नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत मिळाल्याची माहिती चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी दिली आहे.