मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी 102 वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा (Mooknayak) पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईत (Mumbai) प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली. मूकनायकचा पुढील तीन वर्ष सुरु होता. मूकनायकची स्थापना करताना बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढं आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली होती. मूकनायकचं ब्रीदवाक्य म्हणून बाबासाहेबांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती. काय करु आता धरुनिया भीड | नि:शंक हे तोंड वाजविले || नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण | सार्थक लाजून नव्हे हित || या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड ब्रीदवाक्य म्हणून करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक सुरु करण्यामागील वैचारिक भूमिका काय असेल याचे संकेत दिले होते.
मूकनायक सुरु करण्यासंदर्भातील बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका
वृत्तपत्रासारखं समकालीन सामर्थ्यशाली माध्यम हातात असल्याशिवाय अस्पृश्य समाजाच्या दु:खांना दूर केल जाऊ शकत नाही याचा विचार करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची सुरुवात केली. मूकनायकचे पहिल्या 14 अकांचे अग्रलेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते. पहिल्या अंकात बाबासाहेब आंबेडकर लिहितात,
“आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायंवर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तनामनपत्रासारखी अन्य भूमी नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या पत्रांकडे पाहिले असता असे दिून येईल की. त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ठ अशा जातींचे हितसंबध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही.. एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व नुकसान करणाऱ्या जातींचेही नुकसान होणार यात शंका नाही. म्हणून स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करायचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत. हे सुदैवचं म्हणायचे. या पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते; परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणं शक्य नाही, हेही पण उघडचं आहे. त्यांच्या अती बिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे, हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे”, असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं.
छत्रपती शाहू महाराज यांचे पाठबळ
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध किती दृढ होते, हे मूकनायक वृत्तपत्राला राजर्शी शाहू महाराजांनी मूकनायकला केलेल्या 2500 रुपयांच्या मदतीवरुन दिसून येते. कोल्हापूरमधील दत्तोबा पवार हे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. 1919 मध्ये राजर्षी शाहू महाराज मुंबईला आले त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यासंह अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि चळवळ गतिमान करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज असल्याचं सांगितलं होतं. बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अडीच हजार रुपये चेकद्वारे दिले. यानंतर मुकनायकचा अंक प्रकाशित झाला.
तत्कालीन वृत्तपत्र, पाक्षिकांमध्ये अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांची उणीव
मूकनायक सुरु होण्याच्या काळात मराठीमध्ये त्या काळात केसरी, काळ, सुबोध पत्रिका, ज्ञानोदय ही वृत्तपत्र होती. ब्राह्मणेतर चळवळीची विजयी मराठा, दीनमित्र, जागरुक ही वृत्तपत्रं सुरु होती. ब्राह्मणेतर चळवळीच्या वृत्तपत्रांतून अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडले जात होते.पण, जेवढ्या तीव्रतेनं प्रश्न मांडयला पाहिजे होते ते मांडले जात नव्हते. केसरी वृत्तपत्रामध्ये मूकनायकची जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीचं शुल्क देखील पाठवून देण्यात आलं होतं. मात्र, मूकनायकनं केसरीची जाहिरात छापण्यास नकार दिल्याचं अनेक संशोधकांनी मांडलं आहे.
आर्थिक कारणामुंळ मूकनायक बंद
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची स्थापना केल्यानंतरही काही महिन्यांनी ते इंग्लंडला अभ्यासाला गेल. सुरुवातीला संपादक म्हणून काम भटकर पाहत होते. तर, व्यवस्थापक म्हणून काम ज्ञानदेव घोलप पाहत होते. भटकरांकडून अंकाचं काम वेळेत होत नसल्यानं त्यांची जबाबदारी ज्ञानदेव घोलप यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, आर्थिक आणि व्यवस्थापकीय कारणांमुळे अखेर 8 एप्रिला 1923 ला मूकनायक बंद पडलं. पुढील काळात बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
– युवराज जाधव, मुंबई