Home Breaking News Pune@city news पत्रकाराने सुपारी घेवून पत्रकारिता करु नये ! सामाजिक दायित्वाची...

Pune@city news पत्रकाराने सुपारी घेवून पत्रकारिता करु नये ! सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पत्रकारांनी काम करावे – अशोक वानखेडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची अधिवेशनाला भेट शहरातील जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन उत्साहात संपन्न

132

Pune @ city news

● पत्रकाराने सुपारी घेवून पत्रकारिता करु नये !

● सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पत्रकारांनी काम करावे – अशोक वानखेडे

● माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची अधिवेशनाला भेट

● शहरातील जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान

● पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन उत्साहात संपन्न

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

पुणे:पत्रकारितेत या असे निमंत्रण तुम्हाला कोणी दिले नाही. त्यासाठी पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारितेतील सुख, दुःख डोक्यावर घ्यावी लागतील. ग्लॅमरला भुलू नका. पत्रकारितेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली.

अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन काल (शनिवारी) पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक, जेष्ठ पत्रकार मधु जोशी होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे राज्य संघटक, जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, जेष्ठ पत्रकार दीपक मुनोत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते, पत्रकार संघाचे सल्लागार यशवंत भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) वाहतूक आघाडीचे अजीज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे केशव क्षीरसागर, अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा.राजेश सस्ते, संजय सोळंकी, रजणीत कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव व्यासपीठावर होते. जेष्ठ पत्रकार विनायक चक्रे, माधव सहस्त्रबुद्धे, मदन जोशी आणि छायाचित्रकार नरेश नातू, यशवंत नामदे, अतुल मारवाडी यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सकाळच्या सत्रात वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्राचे प्रदर्शन झाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही अधिवेशनाला भेट दिली.

अशोक वानखेडे म्हणाले, “पत्रकारांच्या प्रश्नावर मंथन झाले पाहिजे. शहरातील पत्रकारिता बाईट पत्रकारिता झाली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी पत्रकारिता जीवंत ठेवली. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकार लिहितात. पत्रकारांनी सामान्य माणसासारखे रहावे. त्यातच तुमचे अर्धे प्रश्न सुटतील. पत्रकारांनी एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवावीत. पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्राचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी सर्व क्षेत्राशी निगडित माहिती ठेवलीच पाहिजे. पत्रकारांनी सुपारी घेवून पत्रकारिता करू नये”.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पत्रकार 12 ते 14 तास काम करतात. कोरोना कालावधीत पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पत्रकारांना आरोग्य कवच मिळाले पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज बनून पत्रकार काम करतात. शहराच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे”.

गोविंद घोळवे म्हणाले, “श्रीमान महासाधू मोरया गोसावी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची ही भूमी आहे. कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांनी जीवाची बाजी लावत काम केले”.

यशवंत भोसले म्हणाले, “कोरोना कालावधीत पत्रकारांनी जीवावर उदार होवून काम केले. पत्रकारांचे कौतुक होणे आवश्यक आहे. पत्रकार कष्टातून जात आहेत, याची जाणीव आहे. पत्रकारांचे जीवनमान चांगले झाले पाहिजे. पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करावे. त्यातून आरोग्य विमा, घरकुल योजना राबविण्यात यावी”.

जेष्ठ पत्रकार मधु जोशी म्हणाले, “पत्रकारांनी नेहमी बोलते असावे. टीव्ही चॅनेलचे वृत्त निवेदक बातमी संगण्याऐवजी किचळतात, ओरडतात. ही अयोग्य आहे. ओरडणे, किंचाळने ही पत्रकारिता नव्हे”.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले. रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. तर, सुनील कांबळे यांनी आभार मानले. तर, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, कार्यकारिणी सदस्य सायली कुलकर्णी, सरचिटणीस सुनील कांबळे, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, चिटणीस श्रद्धा कातवडेकर, जिल्हा प्रतिनिधी कलिंदर शेख, गणेश शिंदे, कार्यकारणी सदस्य संतोष जराड, प्रितम शहा, सदानंद रानडे, मुकुंद कदम, अमोल डंबाळे, विश्वास शिंदे, विनय लोंढे, अलताफ शेख, युनूस खतीब, सुहास आढावा यांनी संयोजनात पुढाकार घेतला.