Home Breaking News Chandrapur@city news नाविन्यपूर्ण योजनेतून स्वावलंबाकडे दिव्यांग करतोय वाटचाल :सुरेश पेंदाम

Chandrapur@city news नाविन्यपूर्ण योजनेतून स्वावलंबाकडे दिव्यांग करतोय वाटचाल :सुरेश पेंदाम

164

Chandrapur@city news

■ नाविन्यपूर्ण योजनेतून स्वावलंबाकडे दिव्यांग करतोय वाटचाल :सुरेश पेंदाम

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:समाज कल्याण विभाग समाजातील सर्व समाज घटकांसाठी काम करते. यामध्ये एक घटक हा दिव्यांग सुद्धा आहे. हा घटक सर्व घटकांमध्ये त्याच्या दिव्यांगत्वामुळे मागे राहतो. या घटकांनासुद्धा समाजात सन्मानाचे स्थान त्यांना मिळावे म्हणून समाज कल्याण विभाग हा त्यांच्या गरजा ओळखून विविध योजना राबवित आहे. ज्या दिव्यांगाला शालेय शिक्षणाची गरज आहे त्यांना शालेय शिक्षणात मदत करते तर ज्यांना व्यावसायिक शिक्षण पाहिजे त्यांना व्यावसायिक शिक्षणात मदत करते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा विभाग मदत करते. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर त्याला सुद्धा विभाग मदत करते. बचत गटाच्या माध्यमातून समूह उद्योग सुरु करत असेल तर त्या साठी सुद्धा समाज कल्याण दिव्यांग व्यक्ती व समूहाच्या मदतीला असते. दैनदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या सहाय्यक उपकरणासाठी सुद्धा समाज कल्याण विभागाकडे दिव्यांग व्यक्ती मागणी करू शकतात. या समाज कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ दिव्यांग घेत आहेत आणि समाजामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्वावलंबी बनण्यासाठी वाटचाल करीत आहे. असे मत अध्यक्षीय भाषणातून जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी काल व्यक्त केले .ते या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर आयोजित समता पर्व अंतर्गत जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होते.
सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग यांची कार्यशाळा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत सचिन हेडाऊ, दिव्यांग क्षेत्रात काम करणारे दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे, महिला व दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या श्रीमती सरिता मालू, जेष्ठ नागरिक हेल्पलाईनचे व्यवस्थापक कपिल राऊत, संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोरे, तृतीयपंथीचे प्रतिनिधी कुमकुम बॅनर्जी यांची उपस्थिती होती.

मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग बाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच समाज कल्याणच्या योजनांची संपूर्ण माहिती व त्याची कार्यपद्धती उपस्थित जनसमुदायाला सांगितली. या प्रसंगी १० वी – १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दिनेश कोडापे, बन्सोड, सिडाम, बोरकर, श्रीमती सोनुले, श्रीमती मुंडे, श्रीमती हुजैफा शेख, श्रीमती करमनकर, कु. राबिया आली, कु. लोणकर, आकुलवार, कांबळे, रायपुरे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी वृंदानी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग व इतर बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.