Gadchiroli dist@ news
■पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र
■भविष्यातील पत्रकारितेवर डिजिटल मीडिया कार्यशाळा
गडचिरोली : डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, बिटनिहाय ऑनलाईन पत्रकारिता आणि ब्लॉगिंग, ऑनलाईन रोजगाराची संधी आणि उत्पन्नाची साधने, बातम्यामध्ये की-वर्ड कसे वापरावे, ऑनलाईन ट्रॅफिकमधील फरक आणि सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील फरक, वेबसाईटनिर्मितीचे तंत्र आणि भविष्यातील पत्रकारितेवर सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी देवनाथ गंडाटे यांनी सांगितले की, डिजिटल मीडियातील बारकावे आणि ओळख जर नसेल तर आजचा पत्रकार मागे पडतो. ज्यांना तंत्रज्ञान अवगत आहे, ते रोजगाराची संधी निर्माण करीत आहेत. लिखाणाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास वेबपोर्टलमधूनही कमाई साधता येते, हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी डिजिटल मीडिया कायदा आणि नोंदणी कशी करावी, याची माहिती देण्यात आली.
मागील २० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत देवनाथ गंडाटे यांचे “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यानिमित्त गडचिरोलीतील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी ऍड. मनीष कासर्लावार यांनी प्रास्ताविक केले. समारोपीय कार्यक्रमात पुढील महिन्यात शुभारंभ होऊ घातलेल्या माय खबर २४ या नवीन मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि भविष्यात पत्रकाराना रोजगार कसा मिळेल. याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रीतम मडावी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्रीमंत सुरपाम यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी धर्मदास मेश्राम यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.
कार्यशाळेत वरिष्ठ पत्रकार जयंत निमगडे, प्रवीण चन्नावार, किशोर खेवले, राजू सहारे, क्रिष्णा शेंडे, मिलिंद खोंड, यांच्यासह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.