Home Breaking News • विद्यार्थ्यांच्या बस थांब्याकरिता अंध पित्याची आंदोलनाची तयारी • थांबा असूनही...

• विद्यार्थ्यांच्या बस थांब्याकरिता अंध पित्याची आंदोलनाची तयारी • थांबा असूनही उतरवत असल्याने मनोज खोंडे यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र

109

Bhadrawati taluka@news

• विद्यार्थ्यांच्या बस थांब्याकरिता अंध पित्याची आंदोलनाची तयारी

• थांबा असूनही उतरवत असल्याने मनोज खोंडे यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : तालुक्यातील नागपूर चंद्रपूर महामार्गावरचे गाव असलेल्या घोडपेठ येथे फार पुर्वीपासून जलद बसेसचा थांबा मंजूर झालेला आहे. मात्र असे असतांनाही घोडपेठ येथील प्रवाशांसोबत नेहमी वाद घालत चालक व वाहकाकडून बस थांबवण्यात येत नाही. मात्र आता थांबा असूनही विद्यार्थी असलेल्या स्वत:च्या मुलाशी हुज्जत घालत वारंवार चालत्या बसमधून उतरवण्यात येत असल्याचा प्रकार घडत असल्याने घोडपेठ येथील अंध पिता मनोज खोंडे यांनी चंद्रपूर येथील आगार व्यवस्थापकांना थेट पत्र पाठवत विद्यार्थ्यांसाठी जलद बसेस न थांबल्यास सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करत आंदोलन उभारावे लागेल काय असा प्रश्न विचारल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महामंडळाकडून या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावातील नागरिकांची विनंती, तत्कालीन २००९ सालातील ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार व घोडपेठ येथील लोकप्रतिनिधी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ यांनी सतत पाठपुरावा करत मोठ्या संघर्षाने घोडपेठ येथे जलद बस थांबा मिळवून दिला. विभाग नियंत्रक चंद्रपूर यांच्या कार्यालयाकडून आगार व्यवस्थापकांना १९ सप्टेंबर २०११ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार घोडपेठ येथे याआधीच सर्व जलद बसेसचा थांबा देण्यात आला असूनही जलद बसेस थांबत नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे घोडपेठ येथे जलद बस थांबवण्याबाबत आगार प्रमुखांनी चालक व वाहकांना पुन्हा एकदा सुचित करण्याबाबत कळविण्यात आले होते.

मात्र यानंतरही जलद बसेस थांबत नसल्यामुळे एक आठवडा सतत घोडपेठ येथील बसस्थानकावर रा. प. महामंडळाकडून एक कर्मचारी तैनात करत त्यांच्यामार्फत बस थांबवून प्रवाशांना बसमध्ये बसवून देण्यात आलेले होते. दि. ८ नोव्हेंबर २०१२ रोजीच्या विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयाकडून तत्कालीन खासदार तथा सध्याचे ओबीसी आयोगाचे राष्ट्रिय अध्यक्ष हंसराज अहिर यांना पाठविलेल्या पत्रात हे वास्तव लिहिलेले आहे. त्यामुळे जलद बस थांबा मिळूनही प्रवास करण्यासाठी घोडपेठ वासियांना किती संघर्ष करावा लागला याची प्रचिती येते. मात्र घोडपेठवासियांचा हा संघर्ष अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.

घोडपेठ व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भद्रावती व चंद्रपूर येथे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून भद्रावती येथून कॉलेज आटोपून घोडपेठ येथे परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहकांकडून अपमानास्पदरीत्या मध्येच उतरवण्यात येत आहे. तर सकाळच्या वेळेस जलद बस थांबत नसल्याने तसेच साधारण बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी खासगी किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करत अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा बसचा पास काढलेला आहे. याविरोधात घोडपेठ येथील अंध पिता मनोज खोंडे यांनी आगार व्यवस्थापकांना पत्र लिहिले असून यासंबंधात लक्ष देवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडेसुध्दा करण्यात आली आहे.