Home Breaking News विशेष लेख ◼️नवरात्र आणि बळीराजा…!

विशेष लेख ◼️नवरात्र आणि बळीराजा…!

159

विशेष लेख ◼️नवरात्र आणि बळीराजा…!

♦️🌺अश्विनी सुभाष दीक्षित सहज सुचलं सदस्य बारामती जि. पुणे

सुवर्ण भारत:किरण घाटे (सहसंपादक)

◼️◻️आपले सण, उत्सव ही आपल्या भारताची ओळख आहे. भारतीय परंपरा, संस्कृती व सण हे फक्त आध्यात्मिक, उत्साह आनंद चैतन्य देत नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनही देतात… आणि हेच प्रत्येक सण आणि उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो. त्यामुळं त्याला शेतीच्या दृष्टीनं महत्व आहे.

घटस्थापनेला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतात पिकं व्यवस्थित येईल का? तसेच शेतात पुरेस पाणी आहे का? पिकाची उगवण क्षमता चांगली राहिल का? हे पाहण्यासाठी घटस्थापना केली जाते. पावसाळा संपला की आपण घटस्थापना करतो.

घट नऊ दिवसच का बसवला जातो असा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी उचलली जाते, म्हणजे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळं घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण देखील केले जाते.

घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतू, शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे. घटनस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते.

हा घटस्थापने मागील वैज्ञानिक, नैसर्गिक दृष्टिकोन आपल्या बळीराजांचा आहे.
घटातील धान्य भरपूर प्रमाणात आले की सुख, समृद्धी ,चैतन्य ,उत्साह निर्माण करते. हे देवीच्या चैतन्याचं आणि समृद्धीचं रूप नवरात्रीत सर्व भाविकांना पाहायला मिळतं आणि बळीराजा सुखी होतो…
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।