Ghugus city@ news
• अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा
•पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर: घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनबाधित १६० कुटुंबियांना हक्काची घरे मिळणार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले आहे. पट्टे मिळवून देण्यासाठी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी अथक पाठपुरावा केला होता.
महसूल व वन विभागाने आपत्तीप्रणव गावाचे पुनर्वसन अंतर्गत अमराई वार्ड घुग्घुस येथील भूस्खलनामुळे बाधित १६० कुटुंबियांच्या पुनर्वसनाकरीता मौजा घुग्घुस येथील शासकीय जमीन स. नं. २९/१ आराजी ५९.४७ हे. आर. जागेपैकी २.४० हे. आर. (६ एकर) जागा उपलब्ध करून देणेबाबत शासनाने दिनांक ०१.११.२०२३ रोजी निर्णय घेतला आहे.
भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. घुग्घुस येथील अमराई वार्डात झालेल्या भूस्खलनात घरे गमावलेल्या बाधित १६० कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याबाबतची आढावा बैठक विधानभवनात महसूलमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्त उपस्थित होते. या बैठकीत भूस्खलनग्रस्तांना तत्काळ भूखंड देण्यासाठी कारवाही करावी अशा सूचना तीनही मंत्रीमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यापूर्वी भूस्खलनग्रस्तांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची तत्काळ मदत भाजपातर्फे करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला होता. मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून धान्यकिट व जीवनावश्यक विविध साहित्याची किट १६० भूस्खलनग्रस्त कुटुंबीयांना वाटप करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे वेकोलितर्फे १६० कुटुंबीयांना प्रत्येकी ६ महिन्याचे घरभाडे दोनदा भूस्खलनग्रस्तांना देण्यात आले होते. माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे भूस्खलनग्रस्त कुटुबियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.
पट्टे मंजूर झाल्याबद्दल भूस्खलनग्रस्तांतर्फे लाडू वाटप करून आनंदोउत्सव साजरा करण्यात आला. सर्व भूस्खलनग्रस्तांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे बबलू सातपुते, शाम आगदारी व मोठया संख्येत भूस्खलनग्रस्त उपस्थित होते.