Mul taluka@ news
• “मीट द प्रेस” उपक्रमा अंतर्गत डॉ.रविंद्र होळींनी उलगडले आयुष्यातील सत्य पैलू !
• मनमोकळे पणाने दिली त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे!
•तहसिलदार झालो नसतो तर वैद्यकीय व्यवसायाकडे वळलो असतो !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर: जिल्ह्यातील
मूलचे तहसिलदार डॉ.रविंद्र होळी तहसिलदार झाले नसते तर? तर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला असता!, ‘तुम्ही नौकरीत नसते तर काय केले असते? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘वैद्यकीय व्यवसाय केला असता’ असे उत्तर दिले. प्रेस क्लब मूलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलूवर भाष्य केले. त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळे होत उत्तरे दिली.
।प्रेस क्लबच्या वतीने शहरातील धोरणात्मक बदल घडविणार्यां व्यक्तीमत्वांना बोलके करण्यासाठी ‘मीट द प्रेस’ची या नवनिर्मित उपक्रमाची सुरूवात मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांचे हस्ते आज करण्यात आली. सदरहु प्रारंभ केलेल्या प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत करीत, असे उपक्रम राबविणारे हे पहिलीच पत्रकार संघटना असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
‘गोटूल ते महसूल’ हा प्रवास कसा झाला? या प्रश्नावर बोलतांना, त्यांनी आपले शालेय शिक्षण कारवाफा येथे व 12 वी पर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे झाल्याचे सांगत, पुढील शिक्षण मुंबई येथे घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आपले वडिल केवळ 4 थी पर्यंत शिकले असले तरी, आम्ही भावंड खूप शिकून मोठे झालो पाहीजे यासाठी सतत ते मार्गदर्शन करीत, आजपर्यंतच्या प्रवासात आपल्या वडिलांचेच योगदान असल्यांचे सांगत, वडिलांच्या आठवणीने ते काही वेळ भावूकही झालेत.
वैद्यकीय शिक्षणानंतर, डॉ. होळी ते युपीएससी करीता दिल्लीत गेलेत. तीथे चार वर्ष युपीएससीची तयारी झाली मात्र त्यात अपेक्षीत यश न मिळाल्यांने परत गावाकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे हेतूने परत आलेत मात्र, 2011—12 मध्ये एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होवून थेट तहसिलदार म्हणून निवड झाल्याने, वैद्यकीय व्यवसाय बाजूला राहीला व आपण महसूल विभागात कार्यरत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसिलदार पदाची महत्वाची जबाबदारी सांभाळत असतांना, आदिवासींना, कुळांना त्यांचे जमिनीचे अधिकार, आदिवासींच्या जमिनीचे प्रत्यार्पण करण्याची संधी मिळाली. हे आपल्यासाठी महत्वाचे असल्याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली. आपल्या लहान भावाचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठीचा पहिला दु:खद प्रसंग असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरादाखल सांगितले.
तहसिलदार म्हणून अनेक कार्यात पाहिल्या पाच तहसिल मध्ये आपली तहसिल असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगीतले. संजय गांधी निराधार योजना, रेशन वाटपात जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी मूल तालुक्यातील असल्याचीही माहीती देत, सामाजीक दायीत्व पूर्ण करता येत असल्याची त्यांनी सांगीतले.
शेती करण्यात आपल्याला बालपणापासून आवड असल्याचे सांगत, संघटीत झाल्याशिवाय धान उत्पादकांना न्याय मिळणार नाही याकडे डॉ. होळी यांनी लक्ष वेधले. मूल तालुक्यात एका शेतक-याकडे सरासरी 1 एकर शेती असल्याने, एवढया कमी आकाराची शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याची नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या कार्यकाळात 4500 चे वर संयुक्त 7/12 मधून स्वतंत्र 7/12 केले असल्याचीही माहीती त्यांनी या वेळी दिली. सरासरी फेरफार करणारे तहसिल कार्यालयात मूल तालुका राज्यात आघाडीवर असल्याची माहीती त्यांनी एका उत्तरात दिली. भविष्यात निवृत्तीनंतर आपण मेडिटेशन करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
