चंद्रपूर: निसर्गाचा ‘रुद्र अवतार’ अन् घामाच्या धारा!
चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर जिल्हा सध्या एका भीषण अग्निपरीक्षेतून जात आहे. औद्योगिक प्रगतीचे चक्र फिरवणाऱ्या या भूमीवर आता जणू आकाशातून ‘सूर्य आग ओकतोय’ असे केवळ म्हणीत उरले नसून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव चंद्रपूरकरांना क्षणोक्षणी येत आहेत.
सकाळची पाऊले घराबाहेर पडण्यापूर्वीच उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. दिवसेंदिवस चढणारा तापमानाचा पारा हा केवळ आकडा नसून तो जनजीवनाला चटके देणारा एक भयाण वास्तव बनला आहे.
या जिल्ह्याच्या नशिबी असलेल्या औद्योगिक धुरासोबतच आता निसर्गाचा कोपही अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. कारखान्यांच्या धगधगत्या भट्ट्या आणि माथ्यावर तळपणारा भास्कर यामुळे संपूर्ण वातावरण एखाद्या तापलेल्या तव्यासारखे झाले आहे. लहान मुलांच्या निरागस हास्यावरही या उन्हाने जणू ‘तुरुंगवास’ लादला आहे. ‘बच्चे मन के सच्चे’ म्हणत उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेणारी चिमुकली पाऊले आता थंडगार सावलीच्या शोधात घराच्या उंबरठ्यातच थबकली आहेत. घराबाहेर पडणे म्हणजे जणू आगीच्या खाईत उडी घेण्यासारखे झाले आहे.
शहरातील मुख्य चौक आणि रस्ते, जे कधीकाळी गजबजलेले असायचे, तिथे आता दिवसाढवळ्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे थंडावली असून, वर्दळ इतकी कमी झाली आहे की जणू संपूर्ण शहराने मौन धारण केले असावे. दुपारच्या वेळी रस्ते ओसाड पडत असून केवळ उष्ण वारेच तिथे संचार करताना दिसतात. घामाच्या धारांनी न्हाऊन निघालेला प्रत्येक नागरिक आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. निसर्गाचे हे दाहक तांडव कधी शांत होईल आणि पुन्हा एकदा शीतल सावली कधी मिळेल, याचीच प्रतीक्षा प्रत्येक जण करीत असल्याचे दिसून येते.अद्यापही कडक उन्हाचा तडाका सुरूच आहे.




