Home Breaking News NEET पेपरफुटी प्रकरण: चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक; शिक्षण...

NEET पेपरफुटी प्रकरण: चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

6
Oplus_131072

NEET पेपरफुटी प्रकरण: चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी 

देशातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, चंद्रपूरच्या वतीने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे.

 

निवेदनात नमूद केल्यानुसार, २०१४ पासून देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत एकूण ९३ विविध परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये एक धक्कादायक साम्य म्हणजे हे बहुतांश पेपर भाजपशासित राज्यांमध्येच फुटले असल्याचे समोर आले आहे. ‘डबल इंजिन’ सरकार म्हणून कार्यक्षम प्रशासनाचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांच्या कष्टांची आणि स्वप्नांची राखरांगोळी होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. वर्षानुवर्षे आई-वडिलांनी कष्टाने कमावलेला पैसा आणि मुलांनी केलेली प्रचंड मेहनत अशा गैरप्रकारांमुळे वाया जात असून, यामुळे युवा पिढी दिशाहीन आणि भविष्यहीन होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 

या संपूर्ण गैरप्रकारात एखादे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शंका असून, ही पूर्णतः शासन आणि प्रशासनाची अकार्यक्षमता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा घटनांमुळे शैक्षणिक व्यवस्थेवरील विश्वास उडत असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवणारी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

हे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा, कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष महेश काहीलकर, अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष दिनेशजी मिश्रा, शहर उपाध्यक्ष अरविंद परचाके, शहर सचिव किशोर शेडमाके, आरिफ सय्यद आणि शहर सचिव शोभा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या. या आंदोलनामुळे जिल्ह्यात शैक्षणिक आणि राजकीय वातावरण तापले असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आता सर्वच स्तरांतून आवाज उठवला जात आहे.