Mul taluka@ news
• जड वाहतुक व प्रदूषणामुळे सुशी दाबगांवचे नागरिक झाले त्रस्त ; उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलन !
• राजू झोडेंनी दिला प्रशासनाला इशारा
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगांव गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून या जड वाहतुकीमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे गावकरी पूर्णतः त्रस्त झाले आहेत.त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा येत्या 9 फेब्रुवारीला गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी आज दिला आहे. या बाबतीत एक लेखी निवेदन मूलचे तहसीलदार यांना सादर करण्यात आल्याची माहिती झोडे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस दिली.
गडचिरोलीच्या सुरजागड येथील लोहखनिज उत्पादन करणाऱ्या कंपनी व्दारे मोठ्या प्रमाणात मूल तालुक्यातील सुशी दाबगांव या गावातून दिवसरात्र आयरणची जड वाहतूक सुरू आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावातील शाळा, अंगणवाडी, रुग्णालय व अन्य परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.त्यांनतर राजू झोडे यांना याबाबत गावकऱ्यांनी सांगितले असता त्यांनी तात्काळ नागरिकांना सोबत घेऊन मूल येथील तहसीलदार यांना निवेदन दिले.तसेच जड वाहतुक व प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास 9 फेब्रुवारीला गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.निवेदन देते वेळी विनोद शेन्डे, पाटील वाळके, श्रीकृष्णा सोमनकर, मंगेश कवार, दुशांत सातपुते, नितु आत्राम, कृत्रिक सातपुते, किशोर आत्राम, पंचशील तामगाडगे, जयेश बुरांडे,अमोल बावणे, रुपेश कोढारे, यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते.
वारंवार सामाजिक संघटना व गावकऱ्यांनी या बाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष पुरविले नाही.हे खरे वास्तव आहे.या आधी सुध्दा या बाबत निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु त्या कडे लक्ष वेधले नव्हते असे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.