Gadchiroli dist@News
•विकास कामात हयगय खपवून घेणार नाही:मंत्री धर्मराव बाबा आत्राम
•मुलचेरा येथे तालुकास्तरीय आढावा सभा
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
मुलचेरा:- गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून पाहिजे तितका निधी देण्यात येत आहे.मात्र, येथील विकास कामांना गती मिळत नसल्याचे दर्शनास येत आहे.त्यामुळे आता विकास कामात दिरंगाई झाल्यास हयगय खपवून घेणार नसल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.
मंत्री धर्मराव बाबा गेली चार दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवार ३ ऑगस्ट रोजी ते मुलचेरा तालुका मुख्यालयातील तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. सुरुवातीलाच त्यांनी तालुका कृषी अधिकारी कडून विविध योजनांची तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत माहिती घेतली.त्यानंतर आरोग्य, शिक्षण,वन विभाग,महसूल,वीज वितरण विभाग,भूमी अभिलेख,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंचाई विभाग, यासह आदी विभागांचा त्यांनी आढावा घेऊन सर्वसामान्यांना वेटीस धरल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.यावेळी तहसीलदार चेतन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,राकॉचे प्रदेश सचिव युनूस शेख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे मागील एक ते दीड वर्षापासून मुलचेरा ते अल्लापल्ली या रस्त्याची चाळण झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाला आहे.वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे भरणे आवश्यक होते.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या आढावासभेत काही नागरिकांनी याची माहिती देखील दिली.मात्र,आढावा सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (क्र.२) कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे गैरहजर होते.त्यांनी शाखा अभियंत्यांना पाठवले होते. त्यामुळे मंत्री धर्मराव बाबा आश्रम यांनी नाराजी व्यक्त केली.
आढावा सभेला गटविकास अधिकारी एल.बी. जुवारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री,पेडिगुडमचे वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने,ठाणेदार अशोक भापकर यांच्यासह आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*आढावा सभेतून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन*
दोन ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेतला होता.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.मात्र खड्डे काही बुजविण्यात आले नाही आणि ३ ऑगस्ट रोजीच्या आढावा सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (क्र.२) कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे हे गैरहजर होते. रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय निघाल्यावर ते गैरजर असल्याचे आढळल्यानंतर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळचे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे (मोहोळ) यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून नाराजी व्यक्त केली तर थेट जिल्हाधिकाऱ्यांना यांना फोन करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.