• बाल्यावस्थेतील बांबू क्षेत्राला उज्वल भवितव्य – व्ही. गिरीराज
सुवर्ण भारत:प्रांजू मखरे प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर : उद्योग व रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेले बांबू क्षेत्र विकसित होण्यासाठी परस्पर समन्वय व सहकार्याने नियोजनबद्ध कार्य होणे महत्त्वाचे आहे कारण येणाऱ्या काळात सकारात्मक सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी पर्यावरण स्नेही बांबू क्षेत्राला उज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी व महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरीराज यांनी केले.
‘द बांबू असोसिएशन ऑफ चंद्रपूर’ या नवस्थापित बांबू उद्योजक, बांबू तंत्रज्ञान पदविका धारक विद्यार्थी, बांबू शेतकरी, बांबू मित्र आणि बांबू कारागीर संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांच्या वन विश्रामगृह, रामबाग येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीला ते संबोधित करीत होते. आपल्या प्रशासकीय आणि बांबू क्षेत्रातील दीर्घ सेवेतील विविध अनुभवांचे दाखले देत ते पुढे म्हणाले की बांबू क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतीने अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन करून गुणवत्ता पूर्ण कार्य करणे आवश्यक असून संशोधन सर्वेक्षण, प्रशिक्षण, कारागीर, स्नेही यंत्र डिझाईन, बांबू डेपो आणि यंत्र खरेदी आदी उपक्रमांना महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान नक्कीच सहकार्य करेल. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू उद्योजक, कारागीर, शेतकरी यांच्या समस्या, अडचणी आणि उपाय यावर सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला प्रसिद्ध बांबू वास्तू विशारद गणेश हरीमकर यांच्यासह द बांबू असोसिएशन ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा स्नेहल पिदुरकर, सचिव अनिल दहागावकर, उपाध्यक्ष किशोर गायकवाड, सहसचिव अभय रॉय, कोषाध्यक्ष अजिंक शास्त्रकार, कार्यकारी सदस्य अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर, आदित्य मसादे, निलेश पाझारे, सागर वर्मा, मीना वाळके, विशाल राठोड, शुभम धुर्वे यांची उपथिती होती.