• वरोरा शहर अनेक समस्यांनी ग्रस्त
• 24 मार्च पर्यंत तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी ,वरोरा
वरोरा : नगर परिषद अंतर्गत शहरात असलेले सार्वजनिक शौचालये आणि अनेक ठिकाणी अतिशय अस्वच्छता असून याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे लोकांनी अनेकदा तक्रारी करूनही स्वास्थ विभाग त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करीत शहरातील पसरलेली अस्वच्छता दूर करावी आणि या अस्वच्छतेस दोषी असलेल्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी येथील समाजसेवक प्रवीण गंधारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील स्वच्छता 24 मार्चपर्यंत दूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आलेला आहे. मागील काही वर्षापासून शहरात झालेली विकास कामे, सफाई विभागातर्फे केलेली कामे व कोरोना काळात केलेल्या खर्चाचे ऑडिट करण्यात यावे.यासाठी पाच ते सहा समाजसेवकांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी ही या निवेदनातून करण्यात आली आहे.
नगर परिषदेतर्फे करण्यात आलेल्या अनेक विकास कामात असलेली अनियमितता आणि सफाईकडे केलेले दुर्लक्षामुळे शहर समस्याग्रस्त आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या आत असलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असून तेथे वीज, पाणी याची व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात सर्वत्र होत असलेले अतिक्रमण, शहरातील बंद असलेले पथदिवे,शहरातील काही भागात होणारा दूषित पाण्याचा पुरवठा शिवाय दर्जाहीन रस्ते,नाल्यांचे बांधकाम याकडे अनेकदा तक्रारी व वर्तमानपत्राद्वारे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले असता ही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावर २४ मार्च पर्यंत तोडगा न काढल्यास २५ मार्च नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही या निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री,नगर विकास मंत्री,वरोरा आमदार व मानवाधिकार आयोग,महिला आयोगाचे अध्यक्षा,जिल्हा नगर प्रशासन सहआयुक्त,एसडीएम, तहसीलदार,नगर पालिका वरोरा,व जिल्हा पोलीस विभाग यांना पाठवण्यात आले आहे.
