विसापूर-कोलगाव पूल ठरत आहे ‘शोपीस’!
जोडरस्त्याअभावी वापर ठप्प ;
तीन वर्षांपासून नागरिक प्रतीक्षेत!
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (प्रतिनिधी, बल्लारपूर)
विसापूर : मोठा गाजावाजा करत विसापूर-कोलगाव दरम्यान वर्धा नदीवरील पूल उभारण्यात आला. २०२० मध्ये पुलाच्या बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये ५६ कोटी ५६ लाख रुपयांची निधी वापरून ३०० मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण होऊन पूल तयार झाला. मात्र तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटूनही पुलाला जोडणारा रस्ता अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांचा पूल वापराअभावी शोपीस ठरत आहे.नागरिकांसाठी अद्यापही बंद अवस्थेतच आहे. त्यामुळे विसापूर व कोलगाव परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी सुरू दिसत आहे.
राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चंद्रपूर बाजारपेठेत तसेच तेलंगणा राज्यात शेतमाल जलद गतीने पाठविण्यासाठी तसेच औद्योगिक दृष्टीने पर्यायी मार्ग म्हणून विसापूर – कोलगाव मार्गे वाहतुकीची सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पूल तयार झाल्याने विसापूर व कोलगाव परिसरातील नागरिकांना मोठी अपेक्षा होती. मात्र जोडरस्ता पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. यासंदर्भात एम. बी. घारपुरे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याशी चर्चा केली असता, निधी अभावी काम रखडल्याची माहिती त्यांनी दिली. निधीअभावी जोडरस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुलाचे काम पूर्ण होऊनही सुरू न झाल्याने विसापूर व कोलगाववासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “मोठा गाजावाजा करून पुलाची निर्मिती झाली, मात्र प्रत्यक्ष उपयोगासाठी तो आजही सुरू झालेला नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून जोडरस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
कोट : निधी अभावी काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शासनाकडून सदर जोड रस्त्यासाठी निधी प्राप्त झाल्यास जून अखेर पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल एस.आय. हलकटी प्रोजेक्ट मॅनेजर, एम.बी. घारपुरे कन्स्ट्रक्शन कंपनी
