Home Breaking News राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान प्रस्तावना वितरण व एसआयआर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान प्रस्तावना वितरण व एसआयआर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

9

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान प्रस्तावना वितरण व एसआयआर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम 

प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर, दि. २१ मे : देशात संगणक आणि दळणवळण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्या नगर येथील त्रिशरण बुद्ध विहार परिसरात संविधान प्रस्तावना वितरण तसेच एसआयआर शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका वाढई या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार श्रीमती रेणुका कोकाटे, मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नगरसेविका श्रीमती मोना धानोरकर, बँक संचालक डॉ. अनिल वाढई, कैलाश धानोरकर, त्रिशरण बुद्ध विहारचे अध्यक्ष संदीप मेश्राम, महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता जुमडे, माजी नगरसेवक गणेश कोकाटे तसेच प्रा. विनय कावडे यांचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या आधुनिक भारत घडविण्यातील योगदानाचा गौरव करत संविधानातील लोकशाही, समता आणि बंधुतेच्या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण करण्यात आले. तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत आयोजित एसआयआर शिबिरात नागरिकांना नाव नोंदणी, दुरुस्ती व पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दादाभाई नौरोजी वार्ड आणि महाराणा प्रताप वार्डातील नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही प्रभागांतील बीएलओंनी मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेसंदर्भात नागरिकांना आवश्यक माहिती देत शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू मारमवार, समय्या जक्कू, संदेश दहेगावकर, शुभम दिवसे, गणेश चौहान, अशोक दंडलवार, जयराज ढेकळे, रशीद शेख, धर्मा महाकाली, राकेश शिवणकर, मुकेश दंडू आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत सहकार्य केले.