• बल्हारपूरचे तहसिलदार अभय गायकवाड यांना घेतले ACB च्या टीमने ताब्यात!
• कारवाई न करण्यासाठी मागितली होती तहसीलदारांनी तब्बल 2 लाखांची लाच !
• अखेर अडकले ते एसीबीच्या जाळ्यात – महसूल विभागात उडाली खळबळ!
• पटवा-याच्या शोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक!
• बल्हारपूरकरांनी केले “या” कारवाईचे स्वागत!
सुवर्ण भारत: किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर एसीबीच्या टीमने आज बल्हारपूरचे तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुकळे यांच्यावर लाच स्वीकारण्याचा प्रकरणात कारवाई केल्यामुळे अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार आपल्या शेतीमध्ये ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने मशागत करीत असल्यामुळे बल्लारपूरचे तहसीलदार व कवडजईचे तलाठी यांनी माती व मुरूम काढण्याची परवानगी नसल्याचे कारण समोर करून 2 लाखांची मागणी केली.
दरम्यान तक्रारदार यांनी या बाबतीत चंद्रपूर लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.
चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बल्लारपूरचे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे .तर तलाठी सचिन रघुनाथ पुकळे यांचा एसीबीचे एक पथक शोध घेत असल्याचे ताजे वृत्त आहे.
तक्रारदार हे मौजा कोठारी येथील रहीवासी असुन ते बिल्डींग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय करतात.तदवतच तक्रारदार यांची मौजा कवडजई, येथे शेती असुन दि. 23 मार्च 2025 रोजी 2 ट्रॅक्टर व 1 जे.सी.बीच्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती व मुरूम काढून शेताचे लेवलींगचे काम करीत असतांना कवडजई साजाचे तलाठी सचिन पुकळे व बल्लारपूर तहसिल कार्यालयाचे तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती व मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले 2 ट्रॅक्टर व 1 जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता 2 लाख रुपये 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्याच दिवशी तलाठी पुकळे व तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून 1 लाख 19 हजार 900 रूपये स्विकारले, मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित 1 लाख रूपये देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून दि. 26 मार्च रोजी चंद्रपूरच्या एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून दि. 26 मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान बल्लारपूरचे तहसिलदार अभय अर्जुन गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनावरून कवडजई साजाचे तलाठी सचिन रघुनाथ पुकळे यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती 90 हजार रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.त्यावरून आज दि. 1 एप्रिल रोजी सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांना तहसीलदार अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला.
आज बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन तहसिलदार अभय गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे . पटवारी सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने एसीबीचे पथक त्याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या स्वगावी रवाना झाले आहेत.
सदरहू कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक दिंगाबर प्रधान यांचे मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व सतिश सिडाम यांनी यशस्वीरित्या पाडली .
या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून बल्हारपूरच्या जनतेंनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
