#Chandrapur
• एसीबीच्या जाळ्यात अडकला मोठा मासा चंद्रपूर जिल्ह्यात उडाली खळबळ!
• चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई!
चंद्रपूर :किरण घाटे
लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पुरेपूर जाणीव असतांना देखील चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील एका कार्यकारी अभियंत्याला लाचेचा मोह टाळता आला नाही.शेवटी तो काल रात्री चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली.
या घटनेमुळे शहरातच नाही तर अख्खा चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सदरहु घटनेतील त्या लाचखोर कार्यकारी अभियंताचे नांव हर्ष यशोराम बोहरे असल्याचे समजते. या लाचखोरा सोबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुशील मारोती गुंडावार व कंत्राटी परिचर मोहम्मद फारुख शेख यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
उपरोक्त घटनेबाबत असे कळते कि
जिवती तालुक्यातील तक्रारदार हे ठेकेदारीचा व्यवसाय करीत आहे. त्यांनी एसीबी कार्यालयात या लाचखोराबाबत तक्रार नोंदवली होती. त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या “जल जीवन मिशन” कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदरहू काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी लाचखोर अभियंता बोहरे यांनी स्वतः करीता ४,००,०००-रूपयांची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक गुंडावार यांनी स्वतः करीता २०,०००/- रूपयांची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४,२०,०००/-रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची बोहरे, यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने बोहरे व गुंडावार, यांचे विरुध्द तक्रारदाने एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी तक्रारदार यांना ४,२०,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक १०/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान गूंडावार यांनी लाच रक्कम ४,२०,०००/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २०,०००/- रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत ४,००,०००/- रूपये मतीन शेख यांना हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने मोहम्मद. मतीन शेख यांनी सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून हर्ष बोहरे यांचे घरी ती लाच रक्कम नेवून दिली. सदरची लाचरक्कम स्वीकानारे अनुक्रमे एक व दोन यांना ताब्यात घेण्यात आले असुन लाचरक्कम नेऊन देणा-यास ताब्यात घेण्यात आले आहे .आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशन येथे आरोपीं लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरहु कारवाई ही पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुरचे दिगंबर प्रधान अपर पोलीस अधीक्षक,नागपूरचे सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक, नागपूरचे संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात चंद्रपूरच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनूले व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईचे जनतेनी स्वागत केले आहे.