• वृक्ष संवर्धन काळाची गरज: आमदार देवराव भोंगळे
• ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम यशोधन विहार, म्हाडा येथे उत्साहात पार
सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
प्रतिनिधी, गडचांदूर

गडचांदूर, नांदाफाटा:
यशोधन विहार म्हाडा वसाहतीमध्ये नुकतेच ‘एक पेड माँ के नाम’ या अभिनव संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते त्यांच्या मातोश्रींच्या नावाने वृक्ष लावून करण्यात आले.
या वेळी बोलताना आमदार भोंगळे म्हणाले की, “वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची नितांत गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून, याला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या वेळी यशोधन विहार चे मुख्य संचालक रवींद्रलाल श्रीवास्तव, पौर्णिमा श्रीवास्तव, ठाणेदार शिवाजी कदम, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, अरविंद डोहे, सतीश उपलेंचवार, ग्रीन लाईफ सोलरचे जनरल मॅनेजर विकास देशपांडे, अरुण रागीट, प्राचार्य अलेक्झांडरीना डीसूझा आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना कमी दरात दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यात येत असून, भविष्यात याचा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यशोधन विहारमध्ये नियमितपणे पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण केले जाते आणि याबरोबरच झाडांचे संवर्धन करणेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत आमदार भोंगळे यांनी मांडले.
कार्यक्रमात विकास देशपांडे यांनी सौरऊर्जेचे महत्त्व व विद्युत बचतीचे उपाय सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर चटप, तर आभार प्रदर्शन सतीश जमदाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला गावातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असून, वृक्षसंवर्धनाचा संकल्प घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
