• घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिनी सहज सुचलंच्या सदस्य तथा पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी यांचा भव्य सत्कार !
• कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती!
किरण घाटे ,चंद्रपूर
आंबेगाव: पत्रकारितेत आपली आगळी वेगळी छाप उमटविणारी व सध्या पुण्यात पिएचडी करणारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील कु.स्नेहा मडावी यांचा आज अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, आंबेगाव सांस्कृतिक उत्सव समिती आणि केंद्रीय दूरसंचार ब्युरो, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याच कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या स्नेहा मडावीचा सत्कार करण्यात आला . अतिशय उत्साहात व थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हजारों आदिवासी बांधव उपस्थित झाले होते.
या सोहळ्याची सुरुवात स्थानिक शरद बँक समीपच्या पटांगणातून एका भव्य रॅलीने झाली.
रॅलीत लेझीम पथक, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक चित्ररथ आणि पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले होते .या भव्य रॅलीने जनतेचे अक्षरशः लक्ष वेधून घेतले होते .रॅलीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले.
रॅलीनंतर मुख्य कार्यक्रम घोडेगाव येथील वनमाला मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुधाजी डामसे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दर्जा असलेले म्हाडाचे शिवाजी अढळराव पाटील, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम पारधी नेते नामदेव भोसले उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या योजनांवर प्रकाश टाकत आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते प्रा. हनुमंत भावरी यांनी आदिवासी विकासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला आदिवासी विकासाच्या विविध योजनांच्या यशोगाथा स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे सुरू केलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’चा शुभारंभ सोहळा थेट स्क्रीनवर दाखवण्यात आला. या थेट प्रक्षेपणाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळुराम भावरी यांनी केले.तर सुरेख सुत्रसंचालन मोहन नंदकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, दुरसंचर विभागाचे फॅनिकुमार ,किरण गाभाले , सुभाष मोरमारे यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी विविध समाजांतील संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकंदरीत सदरहु कार्यक्रम हा आदिवासी संस्कृतीचा गौरव आणि समाजाच्या विकासाची दिशा दर्शवणाराच ठरला.
