
• धनुर्विद्या स्पर्धेत मिथुन मडावी यांचे रजत पदक; राष्ट्रीय स्तरावर निवड
• माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या हस्ते सत्कार
सुवर्ण भारत: गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी
अहेरी : पिंपरी-चिंचवड, पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक पटकावणाऱ्या अहेरी तालुक्यातील होतकरू खेळाडू मिथुन मडावी यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या हस्ते मिथुन मडावी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक मिळवून मिथुन मडावी यांनी पाटियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
सत्कारप्रसंगी राजे अंब्रीशराव महाराज यांनी मिथुन मडावी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडावी, यासाठी मिथुनसारखे खेळाडू प्रेरणास्थान ठरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मिथुन परशुराम मडावी हा राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, महागांव (ता. अहेरी) येथील बारावीचा विद्यार्थी असून, शाळेतील प्राचार्य व वर्गशिक्षकांनी त्याला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सत्कार स्वीकारताना मिथुन मडावी यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, कुटुंबीय आणि शिक्षकवृंद यांना दिले.




