• धावण्याच्या सरावाला जाताना अज्ञात वाहनाची धडक!
• जागीच प्राण गेला! सानियाचे स्वप्न राहिले अपूर्ण!

चंद्रपूर -किरण घाटे
आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून नित्य सकाळी मेहनतीने धावणारी तरुणी काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे. दि. ९ जानेवारी शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास शीर्शी बसस्टॉपजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सानिया रामकृष्ण कोसरे या २० वर्षिय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.ती शीर्शी बेरडी येथील रहिवाशी होती.
सानियाची २० डिसेंबर रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) निवड झाली होती.घरात आनंद,भविष्यासाठी नवी स्वप्ने आणि मुलीच्या यशाचा अभिमान दाटून आला होता.शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सानिया रोजप्रमाणे धावण्याच्या सरावासाठी घराबाहेर पडली होती.मात्र याच वेळी भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की सानियाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.तरुण वयात, उज्ज्वल भवितव्य उंबरठ्यावर असताना झालेल्या या मृत्यूमुळे शीर्शी(बेरडीसह)संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.घरात आई वडील आणि तीन भाऊ असा मोठा आप्तपरिवार असून,त्यांच्या दुःखाला पारावार उरलेला नाही.अपघातानंतर वाहन चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला.अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू असून या घटनेचा तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत.
सानियाच्या जाण्याने समाजाने एक होतकरू,देशसेवेची आस असलेली कन्या गमावली आहे.


