Home Breaking News विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे विवेकानंद जयंती समारोह व विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न.

विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे विवेकानंद जयंती समारोह व विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न.

89

विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे विवेकानंद जयंती समारोह व विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न.

तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना,

क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, क्रीडा क्षेत्राशी त्यांची ओळख व्हावी, जवळीक वाढावी, विद्यार्थ्यांना अभ्यास करून अधिकाधिक गुण प्राप्त करण्यास प्रोत्साहन मिळावे व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्र व विचारांची ओळख व्हावी म्हणून दिनांक 9 जानेवारी, ते 12 जानेवारी, 2026 पर्यंत महाविद्यालयात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन स्तरीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा, युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, मॅराथॉन इत्यादी खेळ आयोजित करण्यात आले. त्यात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील वर्गनिहाय चमू बनवून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोराचे अध्यक्ष, पुरुषोत्तमजी स्वान उपस्थित होते. उद्घाटक म्हणून प्रकाश देरकर, तालुका संयोजक, शालेय क्रीडा स्पर्धा, भद्रावती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनंता मत्ते, तालुका समन्वयक, पतंजली योग समिती, भद्रावती. उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर विजेत्या विद्यार्थी गटांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी, 2026 ला करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष, पुरुषोत्तमजी स्वान उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून सप्तरंग कला मंच भद्रावतीचे अध्यक्ष, रमेशजी खातखेडे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विकांत वरारकर, जनता कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर व नफीस अहमद, माजी सचिव, महाराष्ट्र लोकनृत्य संघ. उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गीत गायन, नृत्य, एकपात्री प्रयोग, नाटिका, लघु नाटिका इत्यादी स्वरूपाचे कार्यक्रम सादर करीत मनोरंजनाबरोबरच उपस्थित प्रेक्षकांचे समाजप्रबोधनही घडवून आणले.
दिनांक 12 जानेवारी, 2026 ला विवेकानंद जयंती, युवा दिन व गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ काॅन्व्हेंट वरोराचे अध्यक्ष, पुरुषोत्तमजी स्वान तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंद निकेतन महाविद्यालय, वरोराचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरविंद बरडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव, अमन टेमुर्डे, शिवाय नगर परिषद भद्रावतीचे उपाध्यक्ष सुधीर सातपुते, पत्रकार संघाचे अध्यक्ष, दिलीप मांढरे, सुधीर पारोधे, नगरसेवक नरेंद्र पढाल, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. सुधीर आष्टूनकर, आयोजन समितीचे समन्वयक, प्रा. जयवंत काकडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद भद्रावती घ्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निर्वाचित झालेले माजी विद्यार्थी योगेश गाडगे, देवेंद्र गडपाले, फैयाज शेख, गौरव नागपुरे, संतोष कुरेकर यांच्याबरोबरच प्रभागातून निर्वाचित झालेले नगरसेवक सौ वृषालीताई पांढरे, अनिल पडोळे यांचाही शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक, डॉ. अरविंद बरडे स्वामी विवेकानंदांचे विचार व कार्य या अनुषंगाने विचार मांडताना म्हणाले की, तत्कालीन भारतीय समाजाची स्थिती लक्षात घेतली तर विवेकानंदांचे विचार व त्यांच्या कार्याची महती खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येईल. विवेकानंदांनी नवभारताच्या निर्मितीचा विचार करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानला. सामान्य माणूस तार्किक, विज्ञानवादी, वास्तववादी झाला तरच भारत विकासाच्या मार्गाने अग्रेषित होईल म्हणून त्यांनी तत्कालीन भारताच्या अनावश्यक राजकीय, आर्थिक, सामाजिक व धार्मिक स्थितीवर कोरडे ओढले व जी जी बाब व्यक्ती विकासाला विरोधक ठरणारी होती अशा सर्व बाबी नाकारून नव्या विचारसरणीचा पुरस्कार करून ती लोकांपुढे ठेवली. विशेषता तरुणांना आव्हान करीत ‘उठा जागे व्हा’ असे म्हणत; आजही आपल्याला जागे होण्याची नितांत गरज आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, पुरुषोत्तमजी स्वान, प्रमुख अतिथी, अमन टेमुर्डे, नरेंद्र पढाल, सुधीर सातपुते व इतर मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी कनिष्ठ, वरिष्ठ व पदव्युत्तर विभागातील शाखा निहाय, विषय निहाय गुणवंत ठरलेले, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, मेडल्स व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य, डॉ. सुधीर आष्टुनकर यांनी केले. संचालन डॉ. गजानन खामणकर, प्रा. संगीता बांबोडे व प्रा नरेंद्र लांबट यांनी केले. तर आभार या कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. जयवंत काकडे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील नागरिकांनी घेतला.