लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा ग्रामीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम;
मुरसा येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरसा : ग्रामीण भागातील महिला व किशोरींच्या आरोग्य संवर्धनासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे आज विशेष हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील महिला व किशोरींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ११२ महिला व किशोरींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
ग्रामीण भागात अनेक महिला व किशोरींमध्ये रक्ताल्पता ही गंभीर समस्या आढळून येते. योग्य आहाराबाबत जागरूकतेचा अभाव, आरोग्य तपासणीची कमी सुविधा तसेच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. या पार्श्वभूमीवर लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेले हे शिबिर महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
या शिबिरामध्ये उपस्थित महिला व किशोरींची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले, अशा लाभार्थींना आवश्यक औषधे व आयर्न टॅब्लेटचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच योग्य आहार, पोषण व नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. पायल कोंडेकर व डॉ. स्नेहा बक्षी यांनी उपस्थितांची सखोल तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला. त्यांनी महिलांना रक्ताल्पतेची कारणे, त्याचे परिणाम तसेच प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन नियमित तपासणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोनिका ठाकरे, लता बावणे व निशा पिंपळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे शिबिराचे आयोजन सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडले.
ग्रामस्थांनी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा लोकहितकारी उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा प्रकारची आरोग्यविषयक शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


