जिल्हा पोलीस अधीक्षकांची वरोरा पोलीस स्टेशनला दिली भेट
वरोरा : ( श. प्र )चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी वरोरा पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आयुष नोपाणी हे यापूर्वी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर कार्यरत होते. या दरम्यान त्यांच्या अधिनस्त असलेल्या वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पावले उचलली होती. त्यामुळे एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची या परिसरात ओळख झाली होती.येथील आनंदनिकेतन महाविद्यालयात चालू असलेल्या सातव्या ग्रीष्मकालीन योग व क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी ते वरोरा येथे आले होते.
तेव्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वरोरा पोलीस स्टेशनला धावती भेट दिली. पोलीस स्टेशनमध्ये आगमन होताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के,पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सलामी देत त्यांचे स्वागत केले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शहरातील समस्यांबाबत चर्चा केली.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस स्टेशनचे निरीक्षण करत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिशा निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आयुष्य नोपाणी यांची निवड झाल्याबद्दल परिसरातील नागरिकात आनंद व्यक्त केला जात आहे.


