Home Breaking News • कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे आदिवासी भागाचा विकास • आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे...

• कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे आदिवासी भागाचा विकास • आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन • भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार

41

• कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे आदिवासी भागाचा विकास

• आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

• भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

अहेरी: शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे माध्यम नाही, तर समाजघडणीची शक्ती आहे. तुम्ही या दुर्गम भागात अखंड परिश्रमाने काम केले आणि आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अजून देखील शेकडो कर्मचारी या संस्थेत सेवा देत आहेत. तुमच्या सेवेमुळेच या मुलांचे आयुष्य बदलेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि संपूर्ण कुटुंब व समाज उज्ज्वल होईल, असं प्रतिपादन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव तथा आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

सिरोंचा येथे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार, १५ मे रोजी पार पडला. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाला भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सिनेट सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, संस्थेचे उपाध्यक्ष ऋतुराज हळगेकर,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर तसेच अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले, आजचा हा सत्कार तुम्हाला दिलेला छोटासा आदर आहे, तुमची निष्ठा आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणा आहे. शिक्षण संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे. तुमच्या मेहनतीमुळे शाळांचे मानवीकरण झाले, मुलांच्या भवितव्यासाठी दार उघडले गेले आणि स्थानिक समाजाचे समग्र विकास साधला गेला. शासनाच्या पलीकडे ही समर्पित सेवा नक्कीच स्तुत्य आहे.

कार्यक्रमात संस्थेच्या तर्फे प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांना शिक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यकाळातील आठवणींचे छायाचित्र व संस्थेच्या विकासात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करून गौरव करण्यात आला. पहिल्यांदा त्यांच्या कार्याचा सार्वजनिक सत्कार होत असल्याने ते भावविभोर झाले.

तसेच सिरोंचा तालुका मुख्यालयात नायब तहसीलदार म्हणून सेवाभावी काम करणारे श्रीनिवास तोटावर व सय्यद हमीद यांचा देखील आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.