लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे विधवा महिलांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
सुवर्ण भारत: पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
घुग्गुस : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्गुस यांच्या
वतीने विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळा” शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे आयोजित करण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनविणे व त्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन व्यवसायाची उभारणी, संगोपन व व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या परिसराच्या वातावरणानुसार योग्य शेळीची जात कशी निवडावी, गोठा बांधणी, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण व आरोग्य निगा, प्रजनन व्यवस्थापन तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत महिलांना सखोल माहिती देण्यात आली.
साफल्य एकता फेडरेशन, उपरवाही येथील पशुसखी कल्पना मडावी व गीता वाडगुरे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान योग्य शेळी व बोकड निवडीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा विश्वास व्यक्त केला.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे प्रशिक्षणानंतर लाभार्थी महिलांना शेळीपालन व्यवसाय उभारणीसाठी प्रत्येकी १ बोकड व ४ गाभण बकऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात एकूण २० महिलांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्यशाळा लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे उपव्यवस्थापक श्री. प्रशांत पुरी व लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. विद्या पाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम, वरिष्ठ अधिकारी डॉ. महेंद्र वैरागडे, अधिकारी महेश उपरे, कनिष्ठ अधिकारी मानस मकासरे तसेच सहाय्यक गजानन बोबडे, अभिजित चौधरी, धनंजय पिंपळशेंडे व आदित्य मोहितकर यांचे सहकार्य लाभले.
ग्रामीण भागातील गरजू महिलांना सक्षम करून त्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे ही लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनची प्राथमिकता असल्याचे डॉ. आदित्य कदम यांनी सांगितले. भविष्यातही अशा प्रकारचे कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे विधवा महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
