Home Breaking News • सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी • माजी...

• सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर

119

• सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर (येर्रागुंटा मेथम), मेडरम, नंदीगाव, चिपुरदुब्बा व रंगय्यापल्ली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई तात्काळ स्थगित करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नागपूर येथील रवी भवन येथे जाऊन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेत निवेदन सादर केले.

संबंधित गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून महसूल विभागात नोंद असलेल्या व स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या जमिनी त्यांच्या नावावर अभिलेखात नोंद असून, शेतीशिवाय अन्य कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मात्र, वनविभागाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या मोजणीच्या आधारे काही जमीन वनक्षेत्रात येत असल्याचा दावा केला जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नोटिसा बजावून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून अंतिम सीमांकन व प्रक्षेपणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना वनविभागाने घाईघाईने कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्थगित करावी, अशी ठाम मागणी शेतकरीवर्गाने केली.

दरम्यान, राजे आत्राम यांनी शेतकऱ्यांची बाजू शांतपणे ऐकून घेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

यावेळी भाजप सिरोंचा तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्मकारी, नारायणपूरचे उपसरपंच अशोक हरी, ज्येष्ठ नागरिक पंते मालय्या, राजन्ना कडेकरी, संपत कडेकरी, स्वामी टाकूर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.