• बामर्डा रेतीघाटावर रक्तरंजित थरार
• पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचा निर्घृण खून; थार, ब्रेझा, क्रेटा गाड्यांची तोडफोड

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा : दिनांक १ मार्च
वरोरा तालुक्यातील वणा नदीवरील बामर्डा रेती घाटावर रविवारी सायंकाळी पैशाच्या वादातून झालेल्या भीषण हल्ल्यात हिंगणघाट येथील रेती व्यापारी भरत दयानंद नागपाल (रा. पुलगाव) यांचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने वरोरा, हिंगणघाट आणि भद्रावती परिसरात एकच खळबळ उडाली असून रेती व्यवसायातील आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन कोटींच्या व्यवहारातून वादाची ठिणगी
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मधुकर ठोंबरे (रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट) हे रेती व गिट्टी वाहतूक व्यवसाय करतात. त्यांनी भरत नागपाल, कैलास धारवाल, भुषण वाघमारे, मयुर गौळकार, योगेश रामटेके, राजू गोवारदिपे, हर्षल बोधाणे, प्रविण घुरडे, अमीत साहू आदी सहकाऱ्यांसह गितेश सातपुते (रा. भद्रावती, सध्या नागपूर) यांच्याकडून बामर्डा येथील वणा नदीचा रेतीघाट विकत घेतला होता.
हा घाट २०२५ मध्ये शासकीय लिलावातून सातपुते यांना मिळाला होता. ठोंबरे व सहकाऱ्यांनी एकूण २ कोटी ५ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. मात्र घाट परत घेण्याच्या अटीवर सुमारे ९८ लाख ६४ हजार रुपये परत करण्याचे सातपुते यांनी मान्य केले होते. ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याने वाद चिघळला.
घाटावर ‘तू बघतो मी’ची धमकी
दि. १ मार्च रोजी सकाळपासून पैशांच्या परताव्याबाबत फोनवरून संपर्क सुरू होता. संध्याकाळी अमोल ठोंबरे, भरत नागपाल व इतर सहकारी चार वाहनांतून – थार, ब्रेझा, क्रेटा व अन्य वाहन – बामर्डा घाटावर गेले.
तेथे रेती उपसाचे काम सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, “तुम्ही घाटात आहात का? बघतो मी तुम्हाला,” अशी धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर घाटातील दोन्ही मार्ग पोकलॅन्ड मशीन लावून बंद करण्यात आले.
तलवारींचा मारा; नागपालांना नदीत फेकले
काही वेळातच काळ्या रंगाच्या थार वाहनातून अमोल कामडी, अक्षय खडसे व इतर आरोपी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हातात तलवारी, दांडे व लोखंडी रॉड होते. त्यांच्यामागून आणखी काही जण आले.
सौरभ ठाकुर याने अमोल ठोंबरे यांच्यावर तलवारीने वार केला. भरत नागपाल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही डोक्यात वार करण्यात आला. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून नागपाल यांना बेदम मारहाण करून नदीत फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांनी त्यानंतर चारही गाड्यांची तोडफोड केली. ड्रममधील डिझेल काढून वाहनांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला. पोलिस येत असल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाले.
अमोल ठोंबरे यांनी ११२ वर कॉल करून मदत मागितली. वरोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने नागपाल यांना बाहेर काढून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी गितेश सातपुते, अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकुर, सुनील झोरे, प्रफुल उमाटे, अतुल मोटघरे व इतरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के करीत आहेत.
अटक करण्यात आलेल्या अतुल मोटघरे, सुनील झोरे व प्रफुल उमाटे या तिघांना न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे रेती घाटांवरील व्यवहार, भागीदारी करार आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. बामर्डा रेतीघाटावरील रक्तरंजित घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




