Home Breaking News • वारजूरकरांच्या निर्गमनाने काँग्रेसला धक्का नाही • उलट नव्या पर्वाची सुरुवात –...

• वारजूरकरांच्या निर्गमनाने काँग्रेसला धक्का नाही • उलट नव्या पर्वाची सुरुवात – विजय वडेट्टीवार

50

• वारजूरकरांच्या निर्गमनाने काँग्रेसला धक्का नाही
• उलट नव्या पर्वाची सुरुवात – विजय वडेट्टीवार

सुवर्ण भारत: सुनील हिंगणकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

Oplus_131072

चिमूर – कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. वारजूरकरांसोबत काँग्रेसचा एकही खरा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी भाजपमध्ये जाणार नाही,” असा ठाम दावा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वारजूरकर बंधूंच्या भाजप प्रवेशावर जोरदार हल्लाबोल केला. चिमूर येथील आधार बंगल्यावर रविवार ला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२५ वर्षे पराभव आणि कार्यकर्त्यांचा वापर-
वडेट्टीवार म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांत वारजूरकरांनी अनेक वेळा निवडणुका लढवल्या, मात्र सातत्याने पराभव पत्करला. निवडणुकीपुरते कार्यकर्त्यांना पुढे करून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडण्याची पद्धत होती. चुकीच्या नियोजनामुळे आणि गटबाजीमुळे काँग्रेसला पराभवांना सामोरे जावे लागले.
त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने वारजूरकरांना विधानसभेची उमेदवारी, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपद, सदस्यपद तसेच महामंडळाचे अध्यक्षपद अशी अनेक संधी दिल्या. एका कुटुंबाला इतकी पदे देऊनही जर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर तो वैयक्तिक स्वार्थासाठीच, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपवर कंत्राटदारराज्याचा आरोप – भाजपवर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, सध्या राज्यात कंत्राटदार -ठेकेदारांचे राज्य सुरू आहे. आमदारही कंत्राटदार झाले आहेत. राजकारण हे सामाजिक सेवेसाठी नसून पैसा कमावण्यासाठी सुरू आहे. भाजप बाहेरून आलेल्यांना कडेवर घेतो, वापरतो आणि नंतर आपटून टाकतो.
भ्रष्टाचार प्रकरणांचा प्रश्न-
ग्रामपंचायतीतील पाच कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचा संदर्भ देत त्यांनी सवाल केला की, आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्या प्रकरणातील कारवाई सुरू राहणार की थांबणार? सीबीआयकडे दिलेल्या तक्रारींचे काय होणार? जनता याचे उत्तर मागेल.
नगरपरिषद निवडणुकीतील अडथळा – चिमूर नगर परिषद आणि भिसी नगरपंचायत निवडणुकीचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले, वारजूरकरांच्या जवळच्या व्यक्तींनी काँग्रेस उमेदवारांविरोधात बंडखोरी केली.त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही.
चिमूरमध्ये काँग्रेसचा नवा अध्याय – वडेट्टीवार यांनी दावा केला की, वारजूरकरांच्या जाण्याने काँग्रेस कमकुवत होणार नाही. उलट चिमूरमध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. घराघरांत काँग्रेस पोहोचेल. गावागावांत काँग्रेस दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिमूर मतदारसंघ हा पुरोगामी, बहुजन, दलित व मुस्लिम समाजाच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगत त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढनार – जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस पूर्ण ताकदीने लढेल. वारे आता उलट्या दिशेने वाहू लागले आहेत. चिमूर विधान सभा क्षेत्रात भविष्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला प्रा. राम राऊत,धनराज मुंगले, डॉ विजय गावडे, गजानन बुटके, जुनेद खान, विनोद बोरकर, दिगंबर गुरफुडे, किशोर शिंगरे, माधव बिरजे, प्रमोद चौधरी, रोशन ढोक, संजय बोढे, रमाकांत लोधे, नागेंद चट्टे, सचिन गाडीवार,आदी नागभीड, चिमूर, सिंदेवाही व ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.