रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम; शहरातील काही भागात पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत
सुवर्ण भारत: शंकर महाकाली
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत
रामनगर येथील १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आवश्यक तांत्रिक दुरुस्ती व देखभाल काम हाती घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवस शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील काही महत्त्वाच्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती तसेच नियमित देखभाल केली जाणार असून, पाणीपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. या तांत्रिक कामादरम्यान जलशुद्धीकरण प्रक्रियेतील काही यंत्रणा तात्पुरत्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने काही परिसरांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या कामाचा परिणाम नगीना बाग, चोर खिडकी, चपराशी कॉलनी, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, अंचलेश्वर वार्ड, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड, बैल बाजार, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी, जलनगर वार्ड, जटपुरा वार्ड, हॉस्पिटल वार्ड, बाजार वार्ड, एकोरी मंदिर वार्ड, ख्रिश्चन कॉलनी, पंचशील चौक, रामनगर, बोकारे प्लॉट, राष्ट्रवादी नगर, आंबेडकर सभागृह नगर, ठक्कर कॉलनी, सिस्टर कॉलनी तसेच जगन्नाथ बाबा नगर या परिसरांतील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता जाणवू शकतो.
महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचा साठा करून पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





