#Ballarpur
• नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; नगरसेवक मोहित


डंगोरे यांचे प्रशासनाला साकडे
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांना भेडसावत असलेल्या तीव्र पाणी समस्येबाबत नगरसेवक मोहित डंगोरे यांनी नगराध्यक्ष अल्का वाढई तसेच पाणी पुरवठा सभापती इस्माइल ढाकवाला यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रभागातील अनेक भागांमध्ये सध्या पाणीपुरवठा अपुरा व अनियमित होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी हँडपंपही निष्क्रिय अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रभागातील जुने व निकामी हँडपंप तातडीने दुरुस्त करून त्यांचे सबमर्सिबल पंपांमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या भागांमध्ये अद्याप पाईपलाईन पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रभागातील गरजू वस्त्यांमध्ये स्टँडपोस्ट नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सहज पाणी मिळू शकेल. पाणी साठवणुकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे व वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
निवेदन स्वीकारताना नगराध्यक्ष तसेच पाणी पुरवठा सभापती यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, प्रभागातील नागरिकांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबवून पाणी समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नियोजनबद्ध कामे हाती घेतल्यास आगामी उन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





