Home Breaking News रमजान ईदपूर्वी बल्लारपूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; भव्य रूट मार्चद्वारे शांततेचा संदेश

रमजान ईदपूर्वी बल्लारपूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; भव्य रूट मार्चद्वारे शांततेचा संदेश

52

रमजान ईदपूर्वी बल्लारपूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; भव्य रूट मार्चद्वारे शांततेचा संदेश

सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर येथे पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क दिसत आहे. याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

हा रूट मार्च पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख व संवेदनशील मार्गांवरून काढण्यात आला. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा, जामा मशिद आणि असमा चौक अशा महत्त्वाच्या भागांतून पोलीसांनी पायी मार्च करत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. हा रूट मार्च पुन्हा पोलीस स्टेशन येथे येऊन समाप्त झाला.

या वेळी पोलीस निरीक्षक बिपिन इंगले, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम तसेच पोलीस कर्मचारी अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड, संतोष येनगंधेवार यांच्यासह एकूण २९ पोलीस कर्मचारी आणि ८ जवान उपस्थित होते. संयुक्त पथकाच्या उपस्थितीमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाली.

या रूट मार्चचा मुख्य उद्देश ईदच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, असामाजिक घटकांमध्ये भीती निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे हा होता. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की सणाच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी परस्परांतील बंधुभाव, सौहार्द आणि शांतता राखत सण साजरा करावा तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीसांना कळवावे. सणाच्या काळात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचा विश्वासही पोलीसांनी व्यक्त केला आहे.