मंगेश रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार” जाहीर
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्र साई ‘पद्मश्री पुरस्कार’ सोहळा येत्या 2 मे 2026 (शनिवार) रोजी शिर्डीत उत्साहात व भव्यदिव्य वातावरणात पार पडणार आहे. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील मंगेश रेगुंडवार यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय स्तरावरील सोहळा सकाळी 9.30 वाजता, परिवार लॉन्स बँकेट हॉल, न्यू रिंग रोड, सिटी मार्केट शेजारी, शिर्डी येथे संपन्न होणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, प्रसन्न वातावरणात होणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
या भव्य कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील एकूण 275 मान्यवरांचा साईंच्या पवित्र भूमीत, प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. सोहळ्यास सुमारे 1000 ते 1200 उपस्थितांची उपस्थिती अपेक्षित असून, नामवंत समाजसेवक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी यांची उपस्थिती लाभणार आहे.
विशेष म्हणजे, या दिमाखदार सोहळ्याची नोंद Limca Book of Records मध्ये करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
साईंच्या पावन नगरीत होणारा हा सोहळा केवळ सन्मानाचा नाही, तर समाजातील प्रेरणादायी कार्यांना उजाळा देणारा ठरणार असून, राज्यभरातील नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.



