Home Breaking News शेती-पैशाच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या; वरोरात खळबळ

शेती-पैशाच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या; वरोरात खळबळ

64

शेती-पैशाच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या; वरोरात खळबळ

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर  वरोरा तालुका, प्रतिनिधी 

वरोरा : शेती आणि पैशांच्या वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वरोरा शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील मेहता हॉलजवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, नामदेव जीवतोडे आणि त्यांचा मुलगा पियुष उर्फ गोलू जीवतोडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेती आणि पैशांच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी (दि. २८) हा वाद विकोपाला गेला.

रागाच्या भरात पियुष उर्फ गोलूने धारदार शस्त्राने वडील नामदेव जीवतोडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर वडील स्लॅबवरून पडून जखमी झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

गंभीर जखमी अवस्थेत नामदेव जीवतोडे यांना तातडीने वरोरातून चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डोक्याला व शरीराच्या महत्त्वाच्या भागांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार मृतकाच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच वरोरा पोलिस व एलसीबी चंद्रपूर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही तासांतच आरोपी पियुष उर्फ गोलू जीवतोडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.