शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला वाढ तातडीने द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
चंद्रपूर -किरण घाटे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव, हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा बल्लारपूर, भुज, वांद्रा व गांगलवाडी, खेड , चांदगाव, मौवशी परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालय सायघाटा येथे आज धडक देऊन कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन वाढीव मोबदला रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.
गोसेखुर्द कार्यालयाचा कारभार आणि शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था या बाबतीत गंभीर बाबी शेतकरी नेते झोडगे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या:
१.मोबदल्याबाबतची फसवणूक आणि आर्थिक शोषण
सन १९८४ पासून गोसेखुर्द प्रकल्पाचे काम सुरू झाले. या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने अधिग्रहित करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून “वाढीव मोबदला” देण्याचे गाजर दाखवून आपल्या कार्यालयाने शेतकऱ्यांकडून कागदपत्रे गोळा केली.
या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये खर्च झाला आहे. विशेष म्हणजे, बाहेर ३०० रुपयांत होणाऱ्या नोटरीसाठी आपल्या कार्यालयाने ठराविक वकिलामार्फत ३००० रुपये आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे.
हा भ्रष्टाचार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
२. प्रशासकीय दिरंगाई आणि मानवाधिकारांचे उल्लंघन
कागदपत्रे जमा करून ६ ते ७ महिने उलटूनही एकाही शेतकऱ्याला दमडीही मिळालेली नाही. सन २००६ ते २०१३ दरम्यान प्रशासन स्वतः गावात येऊन मोबदला वाटप करत असे, मग आता शेतकऱ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला का लावले जात आहे? ही लोकशाही नोकरशाही कि हुकूमशाही?
३. कालव्याची दुरवस्था आणि सिंचनाचा अभाव
शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, परंतु पिढ्यानपिढ्या उलटूनही त्यांच्या शेतात पाणी पोहोचलेले नाही. उलट, निकृष्ट कामामुळे कालवे फुटण्याचे सत्र सुरू आहे. गेल्या वर्षी हळदा B-४ कालव्याची पाळ फुटली होती, तिची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. कालव्यात गाळ साचला असून मोठी झाडे-झुडपे वाढली आहेत. पावसाळा तोंडावर असतानाही साफसफाई झालेली नाही, ज्यामुळे टेलच्या (शेवटच्या) शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे अशक्य आहे.
प्रमुख मागण्या:
बाधित शेतकऱ्यांचा थकीत व वाढीव मोबदला येत्या ७ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करावा.
नोटरी आणि कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून झालेली अतिरिक्त वसुली थांबवून पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कालव्यांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि साफसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे!
उपरोक्त मागण्यांची दखल घेऊन येत्या ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने दिनांक ०५/०५/२०२६ रोजी गोसेखुर्द कार्यालयाला “ताला ठोको” आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान होणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील.असे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्वरित न्याय द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव विनोद झोडगे यांनी केली आहे.यावेळी हळदा येथील माजी उपसरपंच संजय लोणारे, माजी पोलिस पाटील पांडुरंग सावकार राऊत,चांदगावचे माजी सरपंच संदीप बगमारे , रामभाऊ येरावार ,धनंजय नाकतोडे,नंदू ढोरे,विलास तलमले,रामदास तलमले,सदाशिव दमके,विजय लांडेकर,श्रीहरी घुटके, परसराम नखाते, राजेंद्र डोंबळे, लूमाजी राऊत,जिजाबाई गरमळे ,मोतीराम राऊत,चेतन खोब्रागडे, चंदू मेश्राम यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.







