घुग्घुस च्या युवकांसाठी संधीचं दार – लॉयड्स कौशल्य विकास केंद्राची प्रेरणादायी वाटचाल
घुग्घुस परिसरातील युवकांना रोजगारक्षम

बनवण्यासाठी आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या पुढाकारातून सुरु झालेलं लॉयड्स कौशल्य विकास केंद्र आज एक विश्वासार्ह आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
या केंद्राचा शुभारंभ 4 जुलै 2024 रोजी अंटूरला फाटा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी मा. विनय गौडा (IAS), जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त मा. भैय्याजी येरेमे तसेच LMEL चे उपाध्यक्ष श्री. पवन मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
केंद्राची सुरुवात पहिल्या बॅचपासून झाली, ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन (30 विद्यार्थी) आणि फिटर कम मेकॅनिकल (20 विद्यार्थी) असे एकूण 50 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्ष असून त्यात 8 महिने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि 4 महिने LMEL, घुग्घुस येथे ऑन-जॉब ट्रेनिंगचा समावेश आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, 21 डिसेंबर 2024 रोजी इंडियन आयर्न अँड स्टील सेक्टर स्किल कौन्सिल (IISSSC) यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. ही संस्था राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) अंतर्गत कार्यरत आहे. या परीक्षेत लेखी, मौखिक व प्रात्यक्षिक असे सर्व टप्पे समाविष्ट होते. 6 जानेवारी 2025 रोजी जाहीर झालेल्या निकालात सर्व 50 विद्यार्थी यशस्वी ठरले आणि त्यांना IISSSC व NSDC कडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या यशानंतर 1 मार्च 2025 रोजी दुसऱ्या बॅचची सुरुवात करण्यात आली. यावेळी इलेक्ट्रिशियन (20), फिटर (20) यांसोबतच नवीन इन्स्ट्रमेंटेशन (10) हा ट्रेड सुरु करण्यात आला. सध्या तिसरी बॅच देखील याच ट्रेडमध्ये 50 विद्यार्थ्यांसह प्रशिक्षण घेत आहे.
विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नाही तर रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी केंद्राने विविध जॉब प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 30 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यात केंद्राला यश आले आहे आणि ही प्रक्रिया पुढील बॅचसाठीही सुरु आहे.
याशिवाय, LMEL व्यवस्थापनाने आपल्या प्लांट परिसरात नवीन अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात येथे 18 विविध ट्रेड्स सुरु करण्याचे नियोजन असून, अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
स्थानिक प्रशासन आणि LMEL यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे लॉयड्स कौशल्य विकास केंद्र आज घुग्घुस आणि आसपासच्या भागातील युवकांसाठी आशेचा किरण बनले आहे. कौशल्य, रोजगार आणि उज्ज्वल भविष्य यांचा संगम घडवणारी ही वाटचाल निश्चितच परिसराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लॉयड्स कौशल्य विकास केंद्रामुळे आयुष्याला नवी दिशा – विद्यार्थ्याचा अनुभव
घुग्घुस परिसरातील युवकांसाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या लॉयड्स कौशल्य विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशाच एका माजी विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलाची कहाणी सांगितली.
साई कृष्णा ईरामल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सांगतो, “मी फक्त 12वी पास होतो आणि मला कोणत्याही प्रकारचे तांत्रिक ज्ञान नव्हते. त्यामुळे पुढे काय करायचे याबाबत माझे आयुष्य पूर्णपणे दिशाहीन झाले होते.”
तो पुढे सांगतो, “माझ्या एका मित्राकडून मला लॉयड्स कौशल्य विकास केंद्राबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी येथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आयुष्यातील नवीन प्रवासाची सुरुवात झाली.”
केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर त्याचा प्रवास नॉन-टेक्निकल ते टेनिकल शिक्षणाकडे झाला. “येथील शिक्षक आणि मार्गदर्शकांनी मला योग्य मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान त्यांनी आम्हाला दिले. तसेच माझ्यात कोणत्या गोष्टी कमी आहेत हेही मला समजले,” असे तो सांगतो.
लॉयड्स कौशल्य विकास केंद्रामुळे त्याच्या करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. “या केंद्रामुळे मी इंडस्ट्रीसाठी तयार झालो आणि माझ्या करिअरबद्दल स्पष्ट विचार करु लागलो,” असे त्याने नमूद केले.
त्याने 8 महिन्यांचा सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर 4 महिन्यांचे ऑन-जॉब ट्रेनिंग लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले.
यानंतर केंद्राच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची संधी मिळाली. “मी काही मुलाखती दिल्या आणि त्यापैकी एका कंपनीत माझी निवड झाली. सध्या मी चांगल्या पगारावर काम करत आहे,” असे तो अभिमानाने सांगतो.
शेवटी तो म्हणतो, “पूर्वी माझ्या आयुष्याला कोणतेही ध्येय नव्हते. पण लॉयड्स कौशल्य विकास केंद्रात शिक्षण घेतल्यानंतर मला माझे ध्येय समजले आणि आता मी ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. येथे मिळालेले ज्ञान माझे भविष्य घडविण्यास नक्कीच मदत करेल.”
साई कृष्णा ईरामल यांचा हा अनुभव घुग्घुस परिसरातील इतर युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.


