Home Breaking News ओव्हरलोड वाहनांचा कहर; युवक काँग्रेस तर्फे तातडीच्या कारवाईची मागणी

ओव्हरलोड वाहनांचा कहर; युवक काँग्रेस तर्फे तातडीच्या कारवाईची मागणी

161
Oplus_131072

ओव्हरलोड वाहनांचा कहर; युवक काँग्रेस तर्फे तातडीच्या कारवाईची मागणी

सुवर्ण भारत : वैभव मेश्राम 

प्रतिनिधी, बल्लारपूर 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मालवाहू ट्रक, टिप्पर व इतर वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा जास्त मालाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची झपाट्याने होणारी दुरवस्था, वाढते अपघात आणि पर्यावरणीय समस्या यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण रस्ते ओव्हरलोड वाहनांमुळे लवकर खराब होत असून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच, जादा वजनामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघातांची संख्या वाढत असून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत.

याशिवाय, अशा वाहनांमधून होणारा धूर व मोठा आवाज यामुळे पर्यावरण व ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. अनेकदा ओव्हरलोड वाहने पथकर व दंड टाळत असल्याने शासनाचा महसूलही बुडत असल्याची तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग, राज्य मार्ग तसेच खाण परिसरात तपासणी नाके उभारून ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, वजन काट्यांचा प्रभावी वापर करून दोषी वाहन मालक व चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

युवक काँग्रेस बल्लारपूर शहर अध्यक्ष नरेश गुंडापल्ली व  युवा सामाजिक कार्यकर्ते मंगेश बावणे यांनी या संदर्भात निवेदन देऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.