१५ मेपर्यंत नागरिकांना स्वगणनेची संधी; डिजिटल जनगणना मोहिमेला वेग

सुवर्ण भारत:वैभव मेश्राम (बल्लारपूर प्रतिनिधी)
विसापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मेपासून सुरू झालेल्या जनगणना मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, स्वगणना करण्यासाठी १५ मेपर्यंत विशेष मुदत देण्यात आली आहे. बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून स्वगणना करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांना स्वतःची माहिती घरबसल्या भरण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी se.census.gov.in तसेच sc.census.gov.in ही संकेतस्थळे कार्यरत असून, स्मार्टफोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना सहजपणे माहिती भरता येणार आहे.
प्रथम टप्प्यात घरगणनेची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. यात दूरध्वनी व स्मार्टफोनची उपलब्धता, इंटरनेट सुविधा, एलपीजी जोडणी, पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत, वीज व सौरऊर्जा वापर, घरातील शौचालयाचा प्रकार तसेच घराचा प्रकार यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. याशिवाय कुटुंबात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख धान्याबाबतही माहिती विचारली जाणार आहे.
स्वगणना प्रक्रिया १ ते १५ मे या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असून, नागरिकांनी दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करून अचूक माहिती भरावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. डिजिटल जनगणनेच्या या उपक्रमामुळे माहिती संकलन अधिक पारदर्शक आणि जलद होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “ही स्वगणना प्रक्रिया सोपी व सुलभ असून प्रत्येकाने स्वतःहून सहभाग नोंदवावा. १५ मेपर्यंतची ही संधी साधून प्रशासनाला सहकार्य करावे.”


